एकेकाळी 250 रुपयांसाठी खेळला होता क्रिकेट, आता झाली टीम इंडियात एन्ट्री

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये एका सर्वसाधारण परिवारातील तरुणाला जागा मिळाली आहे. पाहूयात कोण हा हा क्रिकेटर आणि त्याच्या संघर्षाची कहाणी...

Navdeep Saini
नवदीप सैनी (फोटो सौजन्य: आरसीबी)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • 250 रुपयांसाठी खेळला होता टेनिस बॉल क्रिकेट
  • 2018मध्ये आरसीबीने 3 कोटींत केलं होतं खरेदी
  • आता सैनी टीम इंडियाकडून खेळण्यास सज्ज

नवी दिल्ली: आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने रविवारी टीम इंडियाची घोषणा केली. निवड समितीने वर्ल्ड कप संपल्यानंतर पुन्हा एकदा युवा खेळाडूंवर विश्वास ठेवत संधी दिली आहे. वेस्ट इंडिज ए विरुद्ध पाच मॅचेसच्या वन-डे सीरिजमध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या इंडिया ए च्या टीममधील खेळाडूंना त्यांच्या प्रदर्शनाचं बक्षीसचं मिळालं आहे. या खेळाडूंपैकी एक आहे दिल्लीतील फास्ट बॉलर नवदीप सैनी. 26 वर्षीय नवदीप सैनी 140 ते 150 किमी प्रति तास या वेगाने बॉलिंग करु शकतो. सैनी याच्या या वेगवान बॉलिंगमुळे वर्ल्ड कप दरम्यान भारतीय बॅट्समनने त्याच्या बॉलिंगवर प्रॅक्टिस केली.

नवदीप सैनी याने इंग्लंडमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी सारख्या बॅट्समनला चांगलीच प्रॅक्टिस दिली. त्यानंतर इंडिया ए टीम सोबत वेस्ट इंडिज दौऱ्यात पोहोचला आणि तेथे आपल्या बॉलिंगचं उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलं. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केल्यावर निवड समितीच्या एमएसके प्रसाद यांनी म्हटलं की, टीम इंडियाची निवड करताना इंडिया ए मधील खेळाडूंचं प्रदर्शन पाहून आम्ही निवड केली आहे. त्यांनी मनीष अग्रवाल आणि श्रेयस अय्यर यांच्यासोबतच कौतुक केलं ते नवदीप सैनी याचं.

एकेकाळी 250 रुपयांसाठी खेळत होता मॅच

हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात राहणारा नवदीप सैनी हा एका सर्वसामान्य परिवारातील. क्रिकेट सुरू केलं तेव्हा कोचिंगचा खर्च करण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी त्याने टेनिस बॉल टूर्नामेंटमध्ये पैसे घेऊन खेळण्यास सुरूवात केली. एक मॅच खेळण्यासाठी नवदीप सैनी याला 250 ते 500 रुपये मिळत होते. अशा प्रकारे मॅच खेळून नवदीप सैनी क्रिकेट कोचिंगचा खर्च काढत होता.

सुमित नरवालमुळे गाठली दिल्लीत

कर्नाल प्रीमिअर लीगमध्ये नवदीप सैनी खेळत असताना त्याची बॉलिंग पाहून दिल्ली रणजी टीमचा माजी सदस्य सुमित नरवाल हा खूपच खूश झाला. सुमित नरवालच या टूर्नामेंटचं आयोजन करत होता. ही टूर्नामेंट संपल्यावर सुमित याने नवदीपला दिल्लीला आणलं. दिल्लीत आल्यापासून नवदीप सैनी याच्या क्रिकेट करिअरचा ग्राफ हा उंचावतचं गेला. याच दरम्यान त्याची भेट गौतम गंभीरसोबत झाली. सैनीचं प्रदर्शन पाहून गौतम गंभीरने सुद्धा त्याला दिल्लीच्या रणजी टीममध्ये डेब्यू करण्याची संधी दिली. सैनीने जेव्हा दिल्लीसाठी आपली पहिली मॅच खेळली तेव्हा दिल्ली रणजी टीमचं नेत्रृत्व गौतम गंभीर करत होता.

 

 

गंभीर, सेहवाग आणि नेहरा टीममध्ये असताना रणजी डेब्यू

नवदीप सैनी याने वयाच्या 21व्या वर्षी 2013-14 च्या रणजी सीजनमध्ये दिल्लीकडून विदर्भच्या टीम विरुद्ध मॅच खेळून डेब्यू केलं. या मॅचमध्ये गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि आशीष नेहरा सुद्धा होते. पहिल्याच मॅचमध्ये सैनीने 7.1 ओव्हर्समध्ये 18 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. सैनी याने आतापर्यंत खेळलेल्या फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 43 मॅचेसमध्ये 120 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याने तीन वेळा इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा बेस्ट स्कोअर 79/7 विकेट्स आहे.

2017-18 रणजी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी

2017-18 मध्ये सैनीने जबरदस्त बॉलिंग करत दिल्लीच्या टीमला रणजी ट्रॉफीमध्ये फायनलमध्ये जागा मिळवून दिली. त्याने 8 मॅचेसमध्ये 34 विकेट्स घेतले होते. त्यानंतर नवदीप सैनी याला आयपीएल सीजनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. दिल्ली डेअरडेविल्सच्या टीमने सैनीला आपल्या टीममध्ये एन्ट्री दिली. 

3 कोटी रुपयांत आरसीबीने केलं खरेदी

2018 साली आयपीएलच्या लिलावात नवदीप सैनी याला खरेदी करण्यासाठी अनेक टीम्सने प्रयत्न केला. विराट कोहलीच्या आरसीबीने त्याला 3 कोटी रुपयांत खरेदी करत आपल्या टीममध्ये एन्ट्री दिली. सैनीने आरसीबीकडून खेळताना 11 विकेट्स घेतल्या. त्याचं उत्कृष्ट प्रदर्शन 24 रन्स देत 2 विकेट्स असा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
एकेकाळी 250 रुपयांसाठी खेळला होता क्रिकेट, आता झाली टीम इंडियात एन्ट्री Description: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये एका सर्वसाधारण परिवारातील तरुणाला जागा मिळाली आहे. पाहूयात कोण हा हा क्रिकेटर आणि त्याच्या संघर्षाची कहाणी...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...