भारत विजयासाठी खेळणार - कोहली

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे होणार आहे.

Team India play for win against England in Ahmedabad
भारत विजयासाठी खेळणार - कोहली 

थोडं पण कामाचं

  • भारत विजयासाठी खेळणार - कोहली
  • अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यात तिसरा आणि चौथा कसोटी सामना
  • डे-नाईट स्वरुपात होणार तिसरा कसोटी सामना

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे होणार आहे. हा डे-नाईट स्वरुपातील सामना उद्यापासून (बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१) सुरू होत आहे. दुपारी अडीच वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर ४ मार्च पासून चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथेच खेळवला जाईल. भारतीय संघ हे दोन्ही कसोटी सामने जिंकण्यासाठी खेळेल, असे कर्णधार विराट कोहली याने सांगितले. (Team India play for win against England in Ahmedabad)

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत पार पडले. पहिला सामना इंग्लंडने आणि दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी अहमदाबादमध्ये होणार असलेले दोन्ही कसोटी सामने जिंकणे अथवा यातील एक सामना जिंकून दुसरा सामना अनिर्णित राखणे भारतासाठी आवश्यक आहे. 

अहमदाबाद येथे खेळवल्या जाणार असलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न भारत करणार आहे. हे प्रयत्न यशस्वी झाले तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात दाखल होईल.

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) क्रमवारीत न्यूझीलंड पहिल्या, भारत दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड अंतिम फेरीसाठी पात्र झालेला पहिला संघ आहे. अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या निमित्ताने निश्चित होणार आहे. याच कारणामुळे अहमदाबादमध्ये होणार असलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांना महत्त्व आहे. अहमदाबादमधील दोन कसोटी सामन्यांसाठी भारत आणि इंग्लंडचा संघ जाहीर झाला आहे.

भारत - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) रोहित शर्मा, इशांत शर्मा, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल.

इंग्लंड - जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक क्राउले, रोरी बर्न्स , बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबले, बेन फोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

भारतीय संघाने शार्दुल ठाकूर याला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज केले. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी रिझर्व खेळाडू म्हणून संघात असलेला बंगालचा अभिमन्यू एस्वरन, झारखंडचा शाहबाज नदीम आणि गुजरातचा प्रियंक पांचाळ यांनाही विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज करण्यात आले आहे.

भारताने अंकित राजपूत, अवेश खान, संदीप वारियर, कृष्णाप्पा गौतम आणि सौरभ कुमार यांचा नेट गोलंदाज म्हणून तसेच के एस भारत आणि राहुल चहर यांचा स्टँड बाय म्हणून समावेश कायम ठेवला आहे. आधी चेन्नईत झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठीही याच जबाबदारीसाठी त्यांची निवड झाली होती. 

अहमदाबादमध्ये एक कसोटी जिंकताच विराट कोहलीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. तो भारतीय भूमीवर सर्वाधिक कसोटी सामने जिंकलेला कर्णधार होणार आहे. याआधी चेन्नईतील एक कसोटी जिंकून त्याने महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अहमदाबादमध्ये तिसऱ्या कसोटीच्या निमित्ताने भारताचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा त्याची कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळणार आहे. जेम्स अँडरसन याने आणखी नऊ बळी घेतले तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावणार आहे. फलंदाजांनाही कामगिरी उंचावून नवे विक्रम स्थापन करण्याची संधी अहमदाबादमध्ये मिळणार आहे. याच कारणामुळे अहमदाबादच्या दोन्ही कसोटी सामन्यांना महत्त्व आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी