ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माला वगळले

India’s Tour of Australia बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ जाहीर केला. सर्व खेळाडू आयपीएल संपल्यानंतर एकाच विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

India’s Tour of Australia
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर 

थोडं पण कामाचं

 • ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
 • विराट कोहली टी ट्वेंटी, वन डे आणि टेस्टसाठी भारताचा कर्णधार
 • दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि ईशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळले

मुंबईः बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ जाहीर केला. यात ३२ क्रिकेटपटू आहेत. सर्व खेळाडू आयपीएल संपल्यानंतर एकाच विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. टी ट्वेंटी, वन डे आणि टेस्ट या तिन्ही प्रकारांसाठी ३२ खेळाडूंमधूनच तीन टीम तयार करण्यात आल्या आहे. विराट कोहली टी ट्वेंटी, वन डे आणि टेस्टसाठी भारताचा कर्णधार असेल. दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि ईशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. नवोदीत वरुण चक्रवर्ती याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आले आहे. (Team India’s T20I, ODI and Test squads for Tour of Australia announced)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फक्त क्रिकेटपटू आणि टीमचे अन्य अधिकारी, कर्मचारी जातील. खेळाडूंना नातलगांना ऑस्ट्रेलियाला नेता येणार नाही. कोरोना संकट असल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोविड प्रोटोकॉल लागू असेल. 

भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार टेस्ट मॅच, तीन वन डे मॅच आणि तीन टी ट्वेंटी मॅच खेळणार आहे. हा जवळपास दोन महिन्यांचा दौरा आहे. खेळाडू, प्रशिक्षक, वैद्यकीय कर्मचारी आणि सहाय्यक अशी जवळपास ५० जणांची भारतीय टीम आयपीएल संपल्यानंतर संयुक्त अरब आमिराती येथून एकाच विमानातून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. 

आधी ऑक्टोबर २०२० मध्ये भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार होता. कोरोना संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल झाले. आयसीसीने २०२०चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप रद्द केला. यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया वन डे सिरिज नोव्हेंबरमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला. टेस्टच्या आधी २६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत वन डे आणि टी ट्वेंटी मॅच होतील. जे खेळाडू टेस्ट खेळणाऱ्या संघात नाहीत ते मायदेशी परततील. फक्त टेस्टसाठीचा भारतीय संघच ऑस्ट्रेलियात जवळपास दोन महिने असेल.

भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सर्वात आधी सिडनीत पोहोचेल. सिडनीत खेळाडू क्वारंटाइन राहतील. क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर खेळाडू सराव सुरू करतील. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकात थोडे बदल करण्यात आले आहेत. सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. टेस्टच्या वेळापत्रकात आवश्यकता भासली तर बदल केले जातील नाही तर टेस्टचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०२०-२१)

 वन डे

 1. पहिली वन डे - २७ नोव्हेंबर, सिडनी
 2. दुसरी वन डे - २९ नोव्हेंबर, सिडनी
 3. तिसरी वन डे - १ डिसेंबर, कॅनबेरा

टी ट्वेंटी

 1. पहिली टी ट्वेंटी - ४ डिसेंबर, कॅनबेरा
 2. दुसरी टी ट्वेंटी - ६ डिसेंबर, सिडनी
 3. तिसरी टी ट्वेंटी - ८ डिसेंबर, सिडनी

टेस्ट

 1. पहिली टेस्ट - १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच)
 2. दुसरी टेस्ट - २६ ते ३० डिसेंबर
 3. तिसरी टेस्ट - ७ ते ११ जानेवारी
 4. चौथी टेस्ट - १५ ते १९ जानेवारी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी ट्वेंटी भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टेस्ट भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमान विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

चार अतिरिक्त गोलंदाज भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जातील - कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल, टी. नटराजन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी