भारताचा जबरदस्त विजय, द. आफ्रिकेला पहिल्याच कसोटीत लोळवलं

Team India Won: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

team india won the first test unilaterally vs south africa taking a 1-0 lead in the series
भारताचा जबरदस्त विजय, द. आफ्रिकेला पहिल्याच कसोटीत लोळवलं  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय
  • पहिल्या कसोटीत रोहित शर्माने झळकावली दोन शतकं
  • भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय

विशाखापट्टणम: टीम इंडियाने आज (रविवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत तब्बल २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय एस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये पहिल्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १९१ धावांमध्ये गुंडाळला गेला आहे. या विजयासह भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी बढत घेतली आहे. या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून पुण्यात खेळविण्यात येणार आहे. 

या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल (२१५ धावा) आणि रोहित शर्मा (१७६ धावा) यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ५०२ धावांचा डोंगर उभा केला. तर दक्षिण आफ्रिकेने देखील पहिल्या डावात भारताला चोख प्रत्त्युतर देत ४३१ धावा केल्या होत्या. यावेळी एल्गरने १६० धावा आणि डी कॉकने १११ धावांची संयमी खेळी केली होती. त्यामुळे भारताला फक्त ७१ धावांची आघाडी मिळाली होती. 

यानंतर यजमान भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात देखील चांगली केली. या डावात देखील रोहित शर्माने शानदार शतक (१२७ धावा) झळकावलं. भारताने ३२३/४ आपला डाव घोषित केला आणि द. आफ्रिकेसमोर विजयासाठी ३९५ धावांचं लक्ष्य ठेवलं. पण या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव हा १९१ धावांवरच आटोपला. या डावात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच बळी घेतले. 

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने आज डावाला सुरुवात करताच दुसऱ्याच ओव्हरमध्ये रविचंद्रन अश्विनने डी ब्रूइन (१० धावा) याला बाद केलं. ही विकेट अश्विनसाठी खूप महत्त्वाची होती. कारण की, यामुळे अश्विनने श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथ्यय्या मुरलीधरनच्या सर्वात वेगवान ३५० कसोटी विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. दोघांनीही आपल्या करिअरमध्ये ६६व्या कसोटीमध्ये ही कामगिरी केली आहे. दरम्यान, यावेळी त्याच्या पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने बावुमा याला बाद करुन पाहुण्या संघावर प्रचंड दबाव आणला. शमीने बावुमाला खातं देखील उघडू दिलं नाही. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करुन भारताला मोठा विजय मिळवून दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी