टीम इंडियाचा मोठा पराभव, वनडे पाठोपाठ कसोटीतही न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश 

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताला ७ विकेटने पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भारताने वनडे सोबत कसोटी मालिका देखील गमावली आहे.

team India's big loss whitewash India to new zealand in test series
टीम इंडियाचा मोठा पराभव, वनडे पाठोपाठ कसोटीतही न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश   |  फोटो सौजन्य: Twitter

क्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. क्राइस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात किवी संघाने तिसर्‍या दिवशी भारताचा तब्बल ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असं निर्भेळ यश मिळवलं आहे. त्यामुळे वनडे पाठोपाठ कसोटी मालिकेतही भारताला न्यूझीलंडने व्हॉईटवॉश दिला आहे. टी-२० मालिकेत न्यूझीलंडला ५-० ने हरवून भारताने या दौर्‍याची जबरदस्त सुरुवात केली होती. पण वनडे आणि त्यापाठोपाठ कसोटी मालिका जिंकून न्यूझीलंडने टीम इंडियाला अक्षरश: बॅकफूटवर ढकललं. न्यूझीलंडने २०१७ पासून त्यांच्या भूमीवरील एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील २४२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला फक्त २३५ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारुन सामना जिंकण्याची मालिका बरोबरीत सोडविण्याची भारतीय संघाकडे नामी संधी होती.  पण दुसर्‍या डावात टीम इंडिया फक्त १२४ धावा करु शकली. त्यामुळे आधीच्या सात धावांची आघाडी मिळून न्यूझीलंडला विजयासाठी फक्त १३२ धावांचीच गरज होती. न्यूझीलंड हे लक्ष्य फक्त ३ गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर टॉम लाथम (५२ धावा) आणि टॉम ब्लंडल ( ५५ धावा) यांच्या शतकी भागीदारीमुळे न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातही सहज विजय मिळवला.

न्यूझीलंडचे सलामीवीरांना झटपट बाद करण्यात गोलंदाजांना यश आलं नाही. २८व्या षटकात लॅथमला उमेश यादवने बाद केलं. पण तोवर खूप उशीर झाला होता. कारण त्यावेळी विजयासाठी अवघ्या काही धावाच शिल्लक होत्या. दरम्यान, कर्णधार विल्यमसन आणि ब्लंडल यांना बुमरा यांना बाद केलं. मात्र, त्यानंतर आलेल्या टेलर आणि निकल्स यांनी फार पडझड होऊ न देता संघाला आरामात विजय मिळवून दिला.  

भारतीय फलंदाज पुन्हा ठरले अपयशी 

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्या प्रमाणेच भारतीय फलंदाज यंदाही फारच अपयशी ठरले. पहिल्या डावात पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमत विहारी यांनी अर्धशतके झळकावली पण दुसऱ्या डावात भारताचा कोणताही फलंदाज २५ धावाही करु शकला नाही. दुसर्‍या डावात भारतीय फलंदाजी अतिशय सुमार कामगिरी केली. कारण सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. 

तिसर्‍या दिवसाची सुरुवात भारताने ६ बाद ९० इथून केली होती. त्यानंतर फक्त ३४ धावा करुन शेवटचे चारही फलंदाज बाद झाले. यावेळी न्यूझीलंडकडून ट्रेंट बाउल्टने दुसऱ्या डावात ४ तर टिम साऊथीने ४ गडी बाद केले. त्याच वेळी, कॉलिन डी ग्रँडहॉम आणि नील वेगनर यांना प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी