पाहा ज्याच्या मागे तुम्ही हात धुवून लागता त्या पोराने आज काय करुन दाखवलं: रवी शास्त्री 

Ravi Shastri: भारतीय संघाच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विजयाचा कळस चढविणारा रिषभ पंत याचं फारच कौतुक होत आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. 

Ravi shastri
पाहा त्या पोराने आज काय करुन दाखवलं: रवी शास्त्री  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं भारतीय संघाचं कौतुक
  • रिषभ पंत याची पाठराखण करत केला कौतुकाचा वर्षाव
  • ही सीरीज कधीही विसरु शकणार नसल्याचं म्हणाले रवी शास्त्री

ब्रिसबेन: ब्रिसबेन कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ३ गडी राखून विजय मिळविल्यानंतर संपूर्ण देशात आता आनंद व्यक्त करण्यात येत आहे. याच विजयानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक (head coach) रवी शास्त्री (ravi shastri) हे देखील खूप आनंदी दिसले. या सामन्यानंतर बोलताना त्यांनी संघातील सर्व खेळाडूंचं मनापासून कौतुक केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या खेळाडूंची पाठराखण देखील केली. यावेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विकेटकिपर-फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) याच्या कामगिरीचं विश्लेषण करताना त्याचं कौतुक केलं. 

'रिषभ हा मॅचविनर आहे. जेव्हा तो किपिंग चांगली करत नाही तेव्हा-तेव्हा लोक त्याच्या मागे लागतात. त्याला ट्रोल केलं जातं. पण जेव्हा तो अशी बॅटिंग करतो तेव्हा पाहा तो काय करु शकतो हे आपल्याला पाहायला मिळालं.'  असं म्हणत रवी शास्त्री यांनी रिषभ पंत याची पाठराखण केली आहे. 

विकेटकिपिंग करताना रिषभ पंतकडून एखादा झेल सुटला किंवा तो स्टम्पिंग करु शकला नाही तर त्याला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जातं. एवढंच नव्हे तर माजी विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी कसा चांगला किपिंग करायचा याचे दाखले दिले जातात. पण असं असलं तरीही आपल्या फलंदाजीत रिषभ या सगळ्याची कसर भरुन काढण्याचा प्रयत्न करतो आणि तेच आजच्या सामन्यात देखील त्याने सर्वांना दाखवून दिलं. आजच्या कसोटी सामन्यात रिषभने १३८ चेंडूत ८९ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ९ चौकार आणि १ षटकार देखील मारला. त्याच्या या नाबाद खेळीमुळे भारताला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवता आला. 

'ही सीरीज मी कधीही विसरु शकणार नाही!' 

दरम्यान, सामना संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी जेव्हा आपल्या भावना व्यक्त केल्या तेव्हा ते म्हणाले की, 'ही सीरीज मी कधीही विसरु शकणार नाही. कारण यावेळी मुलं असं काही खेळली आहेत की, मला काहीही बोलण्याची गरज नाही. त्या सगळ्यांनी आपल्या खेळातूनच प्रत्येकाला चोख उत्तर दिलं आहे. मला सगळ्यात जास्त चांगलं काय वाटलं की, या टीममधील प्रत्येकाची लढण्याची वृत्ती जबरदस्त आहे. खरं तर पहिल्या कसोटीनंतर विराट आमच्यासोबत नव्हता. पण तरीही तो कायम आमच्यासोबतच होता आणि असेल. कर्णधार अजिंक्य रहाणे हा खूप शांत आणि संयमी आहे. पण तो खऱ्या अर्थाने फायटर आहे. तर रिषभ हा मॅचविनर आहे. जेव्हा तो किपिंग चांगली करत नाही तेव्हा-तेव्हा लोक त्याच्या मागे लागतात. त्याला ट्रोल केलं जातं. पण जेव्हा तो अशी बॅटिंग करतो तेव्हा पाहा तो काय करु शकतो.' 

'दुसरीकडे वॉशिंग्टन हा जसा काही २० कसोटी सामना खेळून आला आहे असा वाटत होता. त्याने ज्या पद्धतीने खेळ केला तो अप्रतिम होता. तर शार्दुलने देखील मिळालेल्या संधीचं खऱ्या अर्थाने सोनं केलं. म्हणून मी ही सीरीज कधीही विसरु शकणार नाही. आमच्या मुलांसाठी ही सीरीज काही सोप्पी नव्हती. कारण या मालिकेआधी ते ६-६ महिने क्वॉरंटाइन होते. त्यामुळे अशाप्रकारे इथे येऊन अशा पद्धतीचा परफॉर्मन्स देणं हे खरोखरंच प्रशंसनीयच आहे.' असं म्हणत रवी शास्त्रीने संघातील प्रत्येकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी