ठाणे : लार्सन टूब्रोने टाइम्स ऑफ इंडिया संघाचा १९ धावांनी पराभव करत ४६ व्या ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन टी – २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (The Times of india runner-up of Thane Vaibhavmede, LNT won the Final)
सेंट्रल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत लार्सन टूर्बो संघाने प्रथम फलंदाजी करत १९.५ षटकात १४८ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर उभे केले. शिवा यादवने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करताना आठ चौकारानीशी ४७ चेंडूत ५५ धावा करत संघाच्या एकूण धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. राहुल जोशीने २७ धावा केल्या. पंकज सावंतने गोलंदाजीत छाप पाडताना ४ षटकात एका निर्धाव षटकासह १८ धावांत ३ फलंदाज बाद केले. हृषिकेशने नरे आणि अनिर्बन चौधरीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. अंकित गांधी, परितोष मोहिते, सत्यजित बॅनर्जीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रथमेश आणि परितोष मोहितेने दमदार फलंदाजी करत संघाला विजयाची आस दाखवली. गोलंदाजीप्रमाणे फलदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करताना हृषिकेशने नाबाद २४ धावा केल्या. प्रथमेशने ३१ आणि परितोषने ४० धावा केल्या. या तिघांचा अपवाद वगळता इतर फलंदाज धावा उभारण्यात अपयशी ठरल्याने टाइम्स ऑफ इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. सुशांत शेट्टी आणि जतिन सेठीने मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवत संघाला विजयाच्या नजीक नेले. सिद्धेश चव्हाण, जगदीश सोरखडे आणि सचिन आहुजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
टाइम्स ऑफ इंडियाकडून संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी पंकज सावंत याला बेस्ट बॉलरचा किताब देण्यात आला. तर राकेश पुतरन याला तीन सामन्यात नाबाद राहिल्याबद्दल बेस्ट फलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी टाइम्स ऑफ इंडिया क्रिकेट क्लबचे चेअरमन डॉ. आर. वेंकट केशवन उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या ७-८ वर्षांपासून टाइम्स ऑफ इंडियाच्या संघाने चांगली प्रगती केली आहे. त्यांचा खेळाडूंना कायम पाठिंबा राहिला आहे. आजच्या पराभवानंतरही टीमचे मनोधैर्य उंचविण्यासाठी डॉ. आर. वेंकट केशवन ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर उपस्थित होते. यावेळी टाइम्स ऑफ इंडिया क्रिकेट क्लबचे जॉइंट सेक्रेटरी आणि माजी कर्णधार आशिष सावंत यांनी टीमला फायनलपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. स्वतः गेली २५ वर्ष संघाचा भाग आणि आता मॅनेजमेंटमध्ये गेली १० वर्षांपासून सक्रिय असलेल्या सावंत यांनी आपल्या अनुभवाचा फायदा संघाला करून दिला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाचा उपविजेता संघ