नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (international cricket) पुनरागमन (comeback) करण्यास सज्ज आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील भारतीय संघासमोरचे पहिले आव्हान (challenge) ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) एकदिवसीय मालिका (one day series) जिंकण्याचे असेल. गेल्यावेळी ऑस्ट्रेलियाने जेव्हा भारतदौरा केला होता तेव्हा पाहुण्या संघाने ०-२ने पिछाडीवर गेल्यानंतर पुनरागमन करत ३-२ने मालिका खिशात घातली होती. यानंतर दोन्ही संघांमध्ये अनेक बदल झाले आहेत.
भारतीय संघासाठी उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माची दुखापत ही मोठी चिंता आहे. संघाकडे त्याची जागा भरून काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत, मात्र कोणाला यश मिळणार याबद्दल अद्याप अंदाज लावले जात आहेत.
आम्ही आपल्याला सांगणार आहोत की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या कोणत्या ११ खेळाडूंना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
शिखर धवनने आयपीएल २०२०मध्ये चांगली कामगिरी करत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत तो एका अनुभवी फलंदाजाच्या भूमिकेत दिसेल. त्यामुळे सलामीसाठी शिखर धवन येणे निश्चित आहे. धवनला साथ देण्यासाठी अनेक दावेदार आहेत. मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यापैकी कुणालाही सलामीला येण्याची संधी मिळू शकते. मयंकचीही कामगिरी उत्तम राहिलेली आहे आणि तो ओपनर म्हणून दिसण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाची मधली फळी तशी निश्चित आहे. पण जर के एल राहुलच्या फलंदाजीच्या क्रमात बदल झाला तर मधल्या फळीत त्याच्या जागी कोण येतो हे पाहावे लागेल. कर्णधार कोहली तिसऱ्या क्रमांकावर येणे निश्चित आहे. युवा खेळाडू श्रेयस अय्यरने याआधीही चौथ्या क्रमांकावर आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे आणि पुन्हा एकदा तो ही जबाबदारी पेलताना दिसणार आहे. के एल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळेल. जर राहुल सलामीला आला तर मनीष पांडेला मधल्या फळीत स्थान दिले जाऊ शकते.
हार्दिक पांड्याने आयपीएल २०२०मध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. तर रवींद्र जडेजाही वेळोवेळी भारतीय संघासाठी चांगले प्रदर्शन करत आहे आणि याआधीही ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी त्याने विशेष तयारी केली आहे.
भारतीय संघाच्या जलद गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराहच्या हातात असेल ज्याला मोहम्मद शमीची साथ मिळेल. युवा खेळाडू नवदीप सैनीलाही संधी मिळू शकते तर फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल आपली चमक दाखवताना दिसण्याची शक्यता आहे.
शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल.