टोकियोत वाढले कोरोना रुग्ण, ६ महिन्यांतले सर्वाधिक रुग्ण

ऑलिम्पिक सुरू होण्याआधी टोकियोतील कोरोना संकटाची तीव्रता वाढू लागली आहे. टोकियोत बुधवारी २१ जुलै २०२१ रोजी १ हजार ८३२ नवे कोरोना रुग्ण आढळले. ऑलिम्पिक गावाशी संबंधित ७५ जणांना कोरोना झाला.

Tokyo registers record covid cases just ahead of Olympics
टोकियोत वाढले कोरोना रुग्ण, ६ महिन्यांतले सर्वाधिक रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • टोकियोत वाढले कोरोना रुग्ण, ६ महिन्यांतले सर्वाधिक रुग्ण
  • ऑलिम्पिक गावात ७५ जणांना कोरोना
  • जपानमध्ये २३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

टोकियो: जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहरात २३ जुलैपासून ऑलिम्पिक सुरू होत आहे. पण ऑलिम्पिक सुरू होण्याआधी टोकियोतील कोरोना संकटाची तीव्रता वाढू लागली आहे. टोकियोत बुधवारी २१ जुलै २०२१ रोजी १ हजार ८३२ नवे कोरोना रुग्ण आढळले. मागील सहा महिन्यांत आढळलेल्या दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बुधवारची रुग्णसंख्या मोठी आहे. सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे टोकियो प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. Tokyo registers record covid cases just ahead of Olympics

टोकियोत सुरू असलेली आरोग्य आणीबाणी गुरुवार २२ जुलै २०२१ रोजी संपणार आहे. पण कोरोना संकटाची तीव्रता बघता प्रशासनाला पुन्हा एकदा कठोर उपाय करावे लागतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशबंदी आहे. तसेच विजेत्या खेळाडूंना त्यांचे मेडल स्वतःच्या हाताने गळ्यात घालून घ्यावे लागणार आहे. कोरोनामुळे ऑलिम्पिकच्या निवडक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक वस्तूचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच ती वापरण्याची काळजी घेतली जात आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे. एवढी खबरदारी घेतली जात असली तरी कळत नकळतपणे संसर्ग झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

जपानमध्ये २३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पण लसींचे पुरेसे डोस उपलब्ध नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून जपानमधील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे.

ऑलिम्पिक गावात ७५ जणांना कोरोना

ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच ऑलिम्पिक गावाशी संबंधित ७५ जणांना कोरोना झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. यात सहा अॅथलीट, अठरा खेळांशी संबंधित व्यक्ती, पाच प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्ती, तीन टोकियो ऑलिम्पिकशी संबंधित असलेल्या व्यक्ती, ४२ ऑलिम्पिकशी संबंधित कंत्राटी व्यक्ती, एक स्वयंसेवक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी