भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरीजआधी ६३ सेकंद असणार महत्त्वपूर्ण! 

Phil Hughes: भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी फिल ह्यूज यांना श्रद्धांजली वाहणार आहे. दोन्ही संघ ह्यूजसाठी 63 सेकंदासाठी टाळ्या वाजवतील.

phil_hughes_virat
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरीजआधी ६३ सेकंद असणार महत्त्वपूर्ण!   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी फिल ह्यूजला श्रद्धांजली अर्पण केली जाणार 
  • फिल ह्यूज याची शुक्रवारी सहावी पुण्यतिथी आहे
  • दोन्ही संघ ह्यूजसाठी 63 सेकंदासाठी टाळ्या वाजवतील

सिडनी: India vs Australia ODI series: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात उद्या (शुक्रवार) सिडनी येथे पहिला वनडे सामना असणार आहे. सामना सुरु होण्याच्या ६३ सेकंद आधी दिवंगत क्रिकेटपटू फिल ह्यूज याला टाळ्या वाजवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. कारण शुक्रवारीच क्रिकेटर फिल ह्यूज याची सहावी पुण्यतिथी आहे. शेफिल्ड शिल्ड विरुद्धच्या सामन्यात ह्यूज ६३ धावांवर नाबाद होता जेव्हा सीन अबॉटचा चेंडू त्याच्या मानेच्या मागच्या भागावर आदळला होता. ज्यामुळे त्याला प्रचंड दुखापत झाली होती आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला होता. हा सामना दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात खेळला जात होता.

हेल्मेट परिधान केलेले असूनही चेंडू लागल्यानंतर ह्यूज मैदानावर कोसळला होता. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यानच तो थेट कोमात गेला होता. ब्रेन हेमोरेज झाला ज्यामुळे २७ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला होता. दरम्यान, तीनच दिवसानंतर तो आपला २६वा वाढदिवस साजरा करणार होता. या डावखुऱ्या फलंदाजाने २५ कसोटी आणि २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. इंग्लंडमध्येही त्याने बरंच काऊन्टी क्रिकेट खेळलं होतं.

ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्लॅक बँड बांधतील

ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघातील खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी 63 सेकंद ह्यूजच्या आठवणीत टाळ्या वाजवतील. ज्यामध्ये त्यांच्या अंतिम नाबाद स्कोअरचीही आठवण केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्यूजच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त ब्लॅक बँड बांधून मैदानावर उतरतील. 

दरम्यान, टीम इंडिया संपूर्ण द्विपक्षीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. शुक्रवारी एकदिवसीय मालिकेसह या दौर्‍याची सुरुवात होईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाईल. त्यानंतर १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ- अॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अबॉट, अश्टन अॅगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, मोइसेस हेन्रिक्स, मार्नस, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, अ‍ॅन्ड्र्यू टाय, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम जम्पा 

भारताचा एकदिवसीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी