अंडर-१९ विश्वचषक: बांगलादेश नवा विश्वविजेता, टीम इंडिया पराभूत

LIVE Cricket Score, India vs Bangladesh Under 19 World Cup Final: अंडर-१९ च्या गजविजेत्या भारतीय संघाला विश्वचषकात पराभवाचा झटका बसला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशने ३ गडी राखून विजय मिळवला. 

under 19 world cup final bangladesh won by 3 wickets d/l method india loss 
अंडर-१९ विश्वचषक: बांगलादेश नवा विश्वविजेता, टीम इंडिया पराभूत (फोटो सौजन्य- ICC) 

पोचेफस्ट्रम (द. आफ्रिका): आयसीसी अंडर -१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या भारताला बांगलादेशने ३ विकेट राखून पराभूत केलं आहे. त्यामुळे यंदा अंडर-१९ विश्वचषकात नवा विश्वविजेता गवसला आहे. कारण आजवर एकदाही बांगलादेशने अंडर-१९ विश्वचषक पटकावला नव्हता. पोचेफस्ट्रममधील सेनवेस पार्क स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळविण्यात आला होता. नाणेफेक जिंकून बांगलादेशने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. यावेळी बांगलादेशच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाला फक्त १७७ धावांवरच रोखलं. दरम्यान, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी देखील सामन्यात चांगली कामगिरी केली. मात्र, सामन्यातील  काही षटक शिल्लक असतानाच येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशाला १७० धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. जे बांगलादेशने ३ गडी आणि २३ चेंडू शिल्लक राखूनच पूर्ण केलं. 

पावसामुळे खेळ थांबविण्यात आलं तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने ४१ ओव्हरमध्ये  ७ गडी गमावून १६३ धावा केल्या होत्या. यावेळी बांगलादेशचा कर्णधान अकबर अली (७६ चेंडूत ४२ नाबाद धावा) खेळत होता. तर रकीबुल हसन (१९ चेंडूत ३ नाबाद धावा) खेळत होता. भारताने बांगलादेशसमोर १७८ धावांचं माफक लक्ष्य छेवलं होतं. पण या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची चांगलीच दमछाक झाली.  

१७८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. मात्र, फिरकीपटू बिश्नोई याने ४ बळी घेऊन बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं होतं. मात्र, सलामीवीर परवेज इमोन (४७ धावा) आणि कर्णधार अकबर अली (४३ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने विश्वचषक पटाकावला. 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जयस्वाल (८८ धावा) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यावेळी तिलक वर्मा (३८), ध्रुव जुरेल (२२), प्रियम गर्ग (७), अथर्व अंकोलेकर (३) सुशांत मिश्रा (३) दिव्यंश सक्सेना (२) सिद्धेश वीर (०) कार्तिक त्यागी (०) आणि रवी बिश्नोईने २ धावा केल्या.   बांगलादेशकडून अभिषेक दासने तीन, शेरफुल इस्लाम आणि तंजीम हसन साकीबने प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले तर रकीबुल हसनने एक विकेट घेतली. याशिवाय दोन भारतीय फलंदाज रन आऊट झाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी