Sagar Dhankhar Murder : सुशील दंडुक्याने सागरला मारत असलेला 'त्या' रात्रीचा मर्डरचा व्हिडिओ व्हायरल 

Sagar Dhankhar Murder : कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक केली आहे.

थोडं पण कामाचं

  • कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक केली आहे.
  • नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या अमानुष मारहाणीनंतर सागर धनखडचा मृत्यू झाला होता.
  • सुशील कुमार आपल्या साथीदारांसोबत दिल्लीतून फरार होता.

नवी दिल्ली : कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक केली आहे. नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या अमानुष मारहाणीनंतर सागर धनखडचा मृत्यू झाला होता. यानंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसोबत दिल्लीतून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याच्यासहित इतर आरोपींना अटक केली  आहे.  सध्या सुशील कुमार आणि साथीदार पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान सुशील कुमारने त्या रात्री सागर धनखडवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये सागर धनखड जमिनीवर पडलेला दिसत आहे.  तो हात जोडून विनवणी करतोय पण सुशील कुमार दंडुक्याने त्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. 

माजी ज्युनिअर नॅशनल चॅम्पियन  सागरला सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे २५ मिनिटे मारहाण केली होती. पोलीस नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ही मारहाण थांबवण्यात आली. सुशील कुमारने शहरातील कुस्ती क्षेत्रात आपली दहशत पसरवण्यासाठी हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

“सुशील कुमारने आपला मित्र प्रिन्सला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितलं होतं. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडितांना जनावरांप्रमाणे मारहाण केली. त्याला कुस्ती क्षेत्रात आपली दहशत निर्माण करायची होती,” अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती.

नेमकं काय घडलं होतं त्या रात्री 

 सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर धनखड आणि त्याच्या दोन मित्रांना ४ मे रोजी राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये बेदम मारहाण केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.  तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सागर धनखडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मालमत्तेवरील अतिक्रमण आणि ताबा सोडण्यासाठीची धमकी याचे पर्यवसान ४ मे रोजी मारहाणीत घडले आणि त्यात सागरची हत्या झाली, असे पोलिसांनी सांगितले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी