[VIDEO] कर्णधाराला पत्रकाराचा प्रश्न खूपच झोंबला, विराट प्रचंड भडकला 

न्यूझीलंडविरुद्ध व्हॉईटवॉश मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा पत्रकार परिषदेत चांगलाच भडकलेला दिसून आला.

virat kohli got angry on this question of journalist provoked such anger
[VIDEO] कर्णधाराला पत्रकाराचा प्रश्न खूपच झोंबला, विराट प्रचंड भडकला   |  फोटो सौजन्य: Times Now

क्राईस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळाल्यानंतर कर्णधारपदी विराट कोहली चांगलाच संतापला. यावेळी त्याने आपला राग एका पत्रकारावर व्यक्त केला. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने भारतीय कर्णधार विराट कोहलीला आक्रमकता कशी कमी करावी?, असा सवाल केला, ज्यानंतर विराट कोहलीला चांगलाच भडकला. यावेळी याबाबत उत्तर देण्याऐवजी विराटने पत्रकारालाच सुनावलं. पहिल्या डावात केन विल्यमसन आणि टॉम लॅथम बाद झाल्यानंतर विराट कोहलीने अतिशय आक्रमकपणे मैदानात जल्लोष केला होता. याशिवाय सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात भारतीय कर्णधार प्रेक्षकांकडे पाहून काही तरी आक्षेपार्ह बोलत होता. ही घटना न्यूझीलंडच्या पहिल्या डावात टॉम लॅथम बाद झाल्यानंतर घडली होती. 

दरम्यान, विराटच्या याच आक्रमकतेबाबत एका पत्रकाराने कोहलीला विचारले की, 'आपली आक्रमकता कमी करून संघासमोर एका चांगलं उदाहरण निर्माण करण्याची गरज आहे का?' या प्रश्नावर विराट कोहली चांगलाच संतापला आणि म्हणाला, 'तुम्हाला काय वाटतं? मी तुमच्याकडून उत्तर मागत आहे. तुम्ही हे माहीत करुन घेण्याची गरज आहे की, नेमकं झालं काय होतं. त्यानंतर चांगला प्रश्न मला विचारा, मी सामनाधिकाऱ्यांशी बोललो आहे. आपण अर्धवट ज्ञान घेऊन येथे येऊ शकत नाही. धन्यवाद.' असं विराटने अतिशय रागाने उत्तर दिलं. 

दरम्यान, हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही की,  भारताच्या पराभवानंतर विराट कोहली पत्रकार परिषदेत असं वागला आहे. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहली असाच एका पत्रकारावर  चिडला होता.

न्यूझीलंड दौर्‍यावर कोहलीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. संपूर्ण दौर्‍यामध्ये त्याला एकदाच अर्धशतकं  करता आलं. कसोटी मालिकेत कोहलीला २० धावांचा टप्पादेखील ओलांडता आला नाही. भारतीय संघाच्या खराब फलंदाजीच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडने दुसर्‍या कसोटीत तिसर्‍याच दिवशी सात गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे न्यूझीलंडच्या संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतावर २-० असा विजय मिळवला आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये तिसरे स्थान पटकावले. दरम्यान, भारतीय संघ अद्यापही ३६० गुणांसह पॉइंट टेबलमध्ये आघाडीवर आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला पहिल्यांदाच व्हॉईटवॉश पत्करावा लागला आहे. २०१८ नंतरच्या चौथ्या परदेश दौर्‍यावरील भारतीय कर्णधाराचा हा तिसरा पराभव आहे. दरम्यान गेल्या ८ वर्षात प्रथमच भारताला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळाला आहे. याआधी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियामध्येच ४-० असा भारताचा पराभव केला होता. 

खरं तर भारतीय संघाने न्यूझीलंड दौर्‍याची शानदार सुरुवात केली होती. भारताने पाच सामन्यांच्या टी-२०  मालिकेत ५-० ने विजय मिळवला होता. पण त्यानंतर यजमानांनी जोरदार पुनरागमन करत एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताला अनुक्रमे ३-० आणि २-० ने पराभूत केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी