Virat Kohli steps down : विराट कोहलीने सोडले कसोटी संघाचे कर्णधारपद

Virat Kohli steps down as India's Test captain : विराट कोहलीने भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ असा पराभव झाल्यानंतर कोहलीने कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली.

Virat Kohli steps down as India's Test captain
विराट कोहलीने सोडले कसोटी संघाचे कर्णधारपद 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीने सोडले कसोटी संघाचे कर्णधारपद
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ असा पराभव झाल्यानंतर घेतला निर्णय
  • संदेश ट्वीट करुन कोहलीने भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले

Virat Kohli steps down as India's Test captain : मुंबई : विराट कोहलीने भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ असा पराभव झाल्यानंतर कोहलीने कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. याआधी कोहलीने टी २० वर्ल्डकप नंतर भारताच्या टी २० संघाचे तसेच आयपीएलनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधारपद सोडले होते. बीसीसीआयने कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. यानंतर रोहित शर्माला भारताच्या टी २० आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व दिल्याची घोषणा बीसीसीआयने केली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत होता. पहिल्या सामन्यात भारताचा विजय झाला. दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे कोहली खेळला नाही. या सामन्यात केएल राहुल संघाचा कर्णधार होता. दुसरी कसोटी भारताने गमावली. यानंतर तिसऱ्या कसोटी पुन्हा कोहली संघाचे नेतृत्व करत होता. ही कसोटी पण भारताने गमावली. कसोटी मालिकेत २-१ असा पराभव झाल्यानंतर कोहलीने आज (शनिवार १५ जानेवारी २०२२) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. 

३३ वर्षांच्या विराट कोहलीने त्याचा निर्णय सोशल मीडियातून जाहीर केला. संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल कोहलीने बीसीसीआयचे आभार मानले. 'सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करुन संघाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले. या कामात कोणतीही कमतरता राहू दिली नाही. या प्रवासात आणि माझ्या वैयक्तिक कामगिरीत अनेक चढउतार आले. पण प्रयत्नांमध्ये आणि आत्मविश्वासात कधीही उणीव अथवा कमतरता भासू दिली नाही. माझा १२० टक्के योगदान देण्यावर नेहमीच विश्वास होता'; अशा स्वरुपाचा संदेश ट्वीट करुन कोहलीने भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले. 

कोहली २०१४ पासून भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व करत होता. त्याने ९९ कसोटी सामने खेळून ७९६२ धावा केल्या. विराट कोहलीने ९९ पैकी ६८ कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून खेळताना कोहलीने ७९६२ पैकी ५८६४ धावा केल्या. 

विराटच्या नेतृत्वात भारताने २०१५-१६ मध्ये श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांचा पराभव केला. नंतर २०१६ मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. देशांतर्गत सलग १३ कसोटी सामने जिंकण्याची कामगिरी केली. भारताने सलग चार कसोटी मालिका जिंकल्या. या विजयी घोडदौडीत फक्त पुण्याच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. यानंतर २०१७-१८ मध्ये भारताने श्रीलंकेवर पाठोपाठ विजय मिळवत मालिका जिंकली. नंतर २०१८ मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारताने पुन्हा चांगली कामगिरी केली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ही कामगिरी करणारा भारत हा पहिला आशियाई कसोटी क्रिकेट संघ झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी