बुमराहने 'या' खेळाडूला बाद करताच, सेहवागने केलं भन्नाट ट्वीट

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 05, 2019 | 17:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jasprit Bumrah, ICC Cricket World Cup 2019, India vs South Africa: भारताच्या बुमराहने द. आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला बाद केल्यानंतर वीरुने त्याच्याबाबत अगदी मजेशीर ट्वीट केलं आहे. 

Bumrah_Sehwag_AP
बुमराहने 'या' खेळाडूला बाद करताच, सेहवागने केलं भन्नाट ट्वीट  |  फोटो सौजन्य: AP

साऊथम्पटन: क्रिकेट विश्वचषक २०१९ मधील भारत आज आपला पहिला सामना खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापासून भारताचा विश्वचषक प्रवास सुरु झाला आहे. साऊथम्पटनच्या रोझ बाउल मैदानात सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघातील जसप्रीत बुमराहवर सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. कारण जसप्रीत बुमराह हा आज आपला ५० वा वनडे सामना खेळत आहे. याच सामन्यात बुमराहने नेहमीप्रमाणेच कमाल केली आहे. 

बुमराहने चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर द. आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमलाला दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे कॅच द्यायला भाग पाडलं. त्यावेळी द. आफ्रिकेच्या फक्त ११ धावा होत्या. यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये बुमराहने पुन्हा आपल्या पाचव्या चेंडूवर द. आफ्रिकेचा विकेटकीपर आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक याचा बळी घेतला. डी कॉक हा तिसऱ्या स्लिपमध्ये विराट कोहलीकडे कॅच देऊन बाद झाला. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयपीएलमध्ये डी कॉक हा जसप्रीत बुमराहसह मुंबई इंडियन्स संघातून खेळला होता. याच गोष्टीवरुन आज भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने एक मजेशीर ट्वीट केलं आहे. 

वीरेंद्र सेहवागने बुमराह आणि डी कॉकचा आयपीएलमधील एक फोटो शेअर केला असून त्याचं कॅप्शन मात्र फारच मजेशीर दिलं आहे. '२३ दिवसांपूर्वी दया दाखवली होती आणि खास अंदाजात डी कॉकची साथ दिली होती. पण आज कोणतीही दया दाखवली जाणार नाही. जसप्रीत बुमराह, शानदार स्पेल.' 

वीरेंद्र सेहवाग हा जसा आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता तसाच आता तो ट्विटरवरील आपल्या 'बोलंदाजी'साठी प्रसिद्ध झाला आहे. विश्वचषक नुकताच कुठे सुरु झाला आहे. त्यामुळे जसजशी विश्वचषक स्पर्धा पुढे जाईल तसतशी वीरुची ट्विटरवरील फटकेबाजी देखील वाढत जाणार आहे. सेहवागने ट्वीटरवरुन आतापर्यंत अनेकांची बोलती बंद केली आहे. पाकिस्तानच्या शोएब अख्तरला तर  सेहवागने बऱ्याचदा सुनावलं देखील आहे. त्यामुळे आता या विश्वचषकात सेहवागच्या टार्गेटवर कोण असतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

दरम्यान, जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाला विश्वचषक २०१९मध्ये चांगली सुरुवात करून दिली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोन अतिशय महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करुन भारताला मोठं यश मिळवून दिलं. बुमराहचा हा पहिलाचा विश्वचषक आहे. पण त्याची अशी आक्रमक गोलंदाजी पाहिल्यास कुणीही म्हणणार नाही की तो पहिल्यांदाच विश्वचषक खेळतोय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी