'जर आपण मानवाला चंद्रावर पाठवू शकतो, तर मॅचसाठी रिजर्व-डे का ठेऊ शकत नाही?'

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 16:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Match Washout: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्याने बांगलादेशचे कोच खूपच निराश झाले. यावेळी त्यांनी आयसीसीवर देखील निशाणा साधला. 

match_abandoned_AP
'जर आपण मानवाला चंद्रावर पाठवू शकतो, तर मॅचसाठी रिजर्व-डे का ठेऊ शकत नाही?'  |  फोटो सौजन्य: AP, File Image

लंडन: आयसीसीस क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये पावसाने बरीच समीकरणं बिघडवण्यास सुरुवात केली आहे. विश्वचषकातील १६ व्या सामन्यात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला ज्यामुळे बांगलादेश आणि श्रीलंका यांचा सामना रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघाना १-१ गुणांवर समाधान मानावं लागलं. सामन्याचा अशाप्रकारे निकाल लागल्याने बांगलादेशचे प्रशिक्षक स्टीव्ह रोड्स हे खूपच निराश झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या रागावर संयम ठेऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी आयसीसीवर थेट टीकाही केली आहे. कारण आतापर्यंत पावसामुळे तीन सामने रद्द झाले आहेत. 

स्टीव्ह यांनी पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यांबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'जर आपण मानवाला चंद्रावर पाठवू शकतो तर मॅचसाठी रिजर्व-डे का ठेऊ शकत नाही?' बांगलादेशच्या कोचच्या मते, हे काही रॉकेट सायन्स नाहीए. जर सेमीफायनल आणि फायनलसाठी रिजर्व-डे ठेवला जाऊ शकतो तर मग लीग मॅचसाठी का नाही? दरम्यान, स्टीव्ह रोड्स यांच्या या वक्तव्यानंतर अद्याप आयसीसीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

(बांगलादेशचे प्रशिक्षक स्टिव्ह रोड्सच - फोटो सौजन्य: ट्विटर)

आतापर्यंत या विश्वचषकात तीन वेळेस पावसामुळे सामने रद्द करण्यात आले आहेत. विश्वचषकात पावसामुळे तीन सामने रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी झालेल्या विश्वचषकांमध्ये आतापर्यंत केवळ दोनच वेळा सामने रद्द करावे लागले होते. पण आता तीन सामने रद्द झाल्याने हा देखील विश्वचषकात नवा विक्रम स्थापन झाला आहे. या विश्वचषकात पावसामुळे सामने रद्द होत असल्याने संघांना १-१ गुण द्यावे लागत आहेत. जे या स्पर्धेच्या शेवटी खूपच निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, असं असलं तरीही आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, सेमीफायनल आणि फायनलशिवाय कोणत्याही सामन्यासाठी रिजर्व-डे ठेवणं हे सध्या तरी कठीणच आहे. 

इंग्लंडमधील लहरी वातावरणामुळे पाऊस कधीही बरसत आहे. पण यामुळे विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतील सामने हे रद्द होत आहे.  कोणत्याही निकालाशिवाय संघांना फक्त १-१ गुण दिले जात आहे. यामुळे संपूर्ण स्पर्धेचं गणितच बिघडण्याची भीती क्रिकेट तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अनेकदा काही चांगला संघाना देखील पावसाचा फटका बसतो. त्यामुळे असे संघ या प्रकारामुळे स्पर्धेबाहेर पडण्याची भीतीही निर्माण झाली आहे. तसंच यामुळे स्पर्धेचा निकाल देखील अनपेक्षित लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आयसीसी या सगळ्यावर भविष्यात काही मार्ग काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी