Cricket World Cup : 'या' खेळाडूला १२ वर्षांनंतर पुन्हा वर्ल्ड कप संघात स्थान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 15, 2019 | 21:09 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Cricket World Cup : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली आहे. त्या धोनीसाठी 'बॅकअप' म्हणून दिनेश कार्तिकची वर्णी लागली आहे. त्यासाठी ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, अशी चर्चा होती. अखेर कार्तिकने बाजी मारली.

Dinesh karthik gets second world cup chance instead of wicket keeper rishabh pant
दिनेश कार्तिक १२ वर्षांनंतर पुन्हा वर्ल्ड कप संघात   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रिषभ पंतवर दिनेश कार्तिक ठरला वरचढ
  • अनुभवाच्या जोरावर दिनेश कार्तिकने मिळवले संघात स्थान
  • बारा वर्षानंतर दिनेश कार्तिक पुन्हा वर्ल्ड कप क्रिकेट संघात

नवी दिल्ली : गेले काही दिवस तमाम भारतीय क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागून राहिलेली घटना अखेर आज घडली. इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीने १५ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. मुळात वर्ल्ड कपच्या संघात जवळपास सर्वच खेळाडूंचे स्थान निश्चित होते. पण, संघातील दोन-तीन जागांसाठी संभ्रमाची स्थिती होती. त्यात दुसऱ्या विकेटकीपरसाठी रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात चुरस होती. त्यात निवड समितीने अनुभवी कार्तिकला संधी दिली आहे. विशेष म्हणजे १२ वर्षांनंतर दिनेशला भारताच्या वर्ल्ड कप संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. 

संघ निवडीपूर्वी आक्रमक आणि नव्या दमाच्या रिषभ पंतला संघात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्याचवेळी दिनेश कार्तिकच्या नावाला फारशी पसंती नव्हती. पण, निवड समितीने रिषभच्या ऐवजी कार्तिकवर विश्वास टाकला आहे. अर्थात त्याचे अंतिम ११ जणांच्या संघातील स्थान निश्चित नसल्याचे मानले जात आहे. माजी कर्णधार एम. एस. धोनीला एखाद्या समान्यात विश्रांती द्यायची झाल्यास किंवा तो किरकोळ जखमी झाल्यास त्याच्या जागी दिनेश कार्तिकला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. कदाचित निवड समितीच्या या निर्णयाशी अनेक जण असहमत असू शकतात. पण, आता कार्तिकचे संघातील स्थान निश्चित झाले आहे. त्यामुळे तो संघात असावा की नसावा या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

कार्तिकला पुन्हा संधी

मुळात दिनेश कार्तिकला दुसऱ्यांदा वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजमध्ये २००७मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिकला संधी मिळाली होती. एम. एस. धोनीचादेखील तो पहिलाच वर्ल्ड कप होता. पण, त्या वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळी फेरीतच गारद व्हावे लागले. त्यानंतर २०११मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने भारतातच वर्ल्ड कप जिंकला आणि २०१५ मध्येही ऑस्ट्रेलियात सेमी फायनलपर्यंत  मजल मारली. या दोन्ही वर्ल्डकपमध्ये मात्र कार्तिकला संघात स्थान नव्हते. त्यामुळं कार्तिकला १२ वर्षांनंतर पुन्हा वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले आहे. निदहास ट्रॉफीमध्ये कार्तिकने बांगलादेश विरुद्धच्या अंतिम लढतीत एका चेंडूत पाच धावांची गरज असताना सिक्सर मारून संघाला विजय मिळवून दिला होता. आता वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली तर अशाच खेळाचे प्रदर्शन करून संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप मिळवून देईल, अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमींना आहे.

‘धोनीसाठी बॅक म्हणूनच निवड’

कार्तिकच्या निवडीबाबत निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले, ‘काही कारणांनी धोनी अंतिम संघात नसेल तरच रिषभ पंत किंवा कार्तिक यांचा समावेश होऊ शकतो. यावर आम्ही चर्चा केली. त्यावेळी अनुभव आणि विकेटकिपिंग अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. दोघांमध्ये कार्तिकची विकेट किपिंग रिषभ पंतपेक्षा उजवी असल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. संघात धोनीचा पर्याय म्हणूनच कार्तिकला स्थान असेल. अंतिम ११ जणांच्या संघात त्याचे स्थान निश्चित नाही.’

पंतचा अनुभव कमी पडला

कार्तिकसाठी निदहास ट्रॉफीमधील त्याचे प्रदर्शन फायद्याचे ठरले. त्याच्यामध्ये सामना जिंकून देण्याची क्षमता असल्याचे त्या सामन्यातून सिद्ध झाले होते. दुसरीकडे रिषभ पंतलाही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यात अनेकदा संधी मिळाली होती. पण, मैदानावर ठाण मांडून बसण्यात, सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेण्यात रिषभ पंत कमी पडला अनेकदा त्याने बेजबाबदारपणे आपली विकेट टाकल्याचे पहायला मिळाले म्हणूनच त्याला वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळवता आलेले नाही.

वर्ल्ड कपचा भारतीय संघ असा :  विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल. राहुल, विजय शंकर, एम.एस. धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा और मोहम्‍मद शमी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Cricket World Cup : 'या' खेळाडूला १२ वर्षांनंतर पुन्हा वर्ल्ड कप संघात स्थान Description: Cricket World Cup : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली आहे. त्या धोनीसाठी 'बॅकअप' म्हणून दिनेश कार्तिकची वर्णी लागली आहे. त्यासाठी ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, अशी चर्चा होती. अखेर कार्तिकने बाजी मारली.
Loading...
Loading...
Loading...