IPL 2020: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदाची आयपीएल स्पर्धा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (Board of Control for Cricket in India) अर्थात बीसीसीआयने दुबईत आयोजित केली. ही स्पर्धा यशस्वीपणे पार सुद्धा पडली. 19 सप्टेंबरपासून सुरू झालेला आयपीएल (Indian Premier League)च्या 13वा सीझनचा समारोप 10 नोव्हेंबर रोजी झाला. यामध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा फायनल मॅचमध्ये पराभव करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आयपीएल यूएई (UAE)मध्ये आयोजित करण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयला या हंगामाच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरात क्रिकेट बोर्डाला (Emirates Cricket Board) एक मोठी रक्कम द्यावी लागली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये स्थलांतरित करावी लागली. बीसीसीआयने सर्वप्रथम 14 एप्रिल रोजी आयपीएल पुढे ढकलली आणि नंतर त्याच महिन्यात टूर्नामेंट अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. यानंतर जुलै महिन्यात बीसीसीआयने आयपीएल दुबईत खेळवणार असल्याची अधिकृत घोषणा केली. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने आयपीएल 2020 च्या आयोजनासाठी यूएई क्रिकेट बोर्डाला 4 मिलियन डॉलर (जवळपास 100 कोटी रुपये) दिले. या सीझनमधील सर्वच्या सर्व 60 मॅचेस या यूएईतील दुबई, शारजाह आणि अबुधाबी या तीन मैदानांवर खेळवण्यात आल्या.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले की, भारतात कोरोनाची परिस्थिती आता पूर्वी सारखी राहिली नसून परिस्थिती सुधारली आहे. तसेच लस उपलब्ध झाली तर भारतीय क्रिकेट बोर्ड आयपीएल 2021 चे आयोजन हे भारतातच करु इच्छित आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, आयपीएल 2021 च्या आयोजनासाठी भारत प्रथम प्राधान्य असेल तर यूएई हा एक बॅकअप पर्याय म्हणून ठेवला जाईल.
आयपीएल 2021 चा सीझन हा एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौरव गांगुली यांनी आयपीएल 2021च्या आयोजनावर भाष्य करत म्हटलं, अपेक्षा आहे की तोपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होईल आणि पुढील सीझन भारतातच आयोजित करु.