मुंबई : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएल 2022 (IPL 2022) चे विजेतेपद पटकावल्यानंतर सर्वत्र हार्दिकचे कौतुक होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार (Former England captain) आणि दिग्गज मायकेल वॉनने हार्दिक पंड्याविषयी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने हार्दिकचे भारताचा भावी कर्णधार असे वर्णन केले आहे.
मायकेल वॉनने ट्विट केले की, 'नव्या फ्रँचायझीच्या यशानंतर जर येत्या काही वर्षांत भारताला नवीन कर्णधाराची गरज भासली तर मी हार्दिक पांड्याशिवाय इतर कोणाकडे पाहणार नाही. उत्तम काम गुजरात..' वॉनने खुलेपणाने हार्दिक पांड्याचे कौतुक केले. हार्दिकने माजी चॅम्पियन राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली, तीन विकेट्स घेतल्या आणि 34 धावा केल्या.
दरम्यान रोहित शर्मा सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याने ही जबाबदारी विराट कोहलीकडून घेतली आहे. रोहितचे वय आता 34 वर्षे आहे. अशा स्थितीत तीन-चार वर्षांनंतर निवडकर्त्यांना भावी कर्णधार शोधावा लागेल आणि त्यासाठी हार्दिक हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.IPL 2022 मध्ये 487 धावा करण्यासोबतच हार्दिक पांड्याने आठ विकेट्सही घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात त्याच्या चमकदार कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला नऊ विकेट्सच्या मोबदल्यात 130 धावांवर रोखले. हार्दिकने 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळीही खेळली, त्यानंतर शुभमन गिल (नाबाद 45) आणि डेव्हिड मिलर (32 धावा) यांनी संघाला लक्ष्यापर्यंत नेले. गुजरात टायटन्सने पहिल्या सीजनमध्येच विजेतेपद पटकावून इतिहास रचला. गुजरातच्या या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं.
सुनील गावस्कर आणि टायटन्स संघाचे मार्गदर्शक गॅरी कर्स्टन यांच्यासह अनेक वर्तमान आणि माजी खेळाडूंनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेक प्रसंगी गुजरातचे प्रशिक्षक आशिष नेहरा देखील हार्दिकचे कौतुक करताना दिसला.