नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. आता आयपीएलवरही कोरोनाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. महाष्ट्रात कोरोनाचं संकट वाढत आहे. वानखेडे स्टेडियमच्या स्टाफपैकी आठजणांना कोरोना झाला आहे. यामुळे मुंबईतील आयपीएलचे सामने पर्यायी जागांवर खेळवले जाण्याची शक्यता आहे.
महाष्ट्रात कोरोनाबाधिताचा आकडा दररोज वाढत आहे. यामुळे मुंबईत होणारे आयपीएलचे सामने हैदराबाद आणि इंदौर किंवा इतर ठिकाणी आयोजित करण्याचा विचार इंडियन प्रिमियर लीगचे गव्हर्निंग कौन्सिल (जीसी) करत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासह मुंबईच्या वानखेडे मैदानावरील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, यामुळे आयपीएल फ्रँचायझी ९ एप्रिलपासून होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या सत्रासाठी चिंतेत झाले आहेत.
वानखेडे स्टेडियमवर १० -२५ एप्रिलच्या दरम्यान आयपीएलचे १० सामने खेळवले जाणार असल्याचं वेळापत्रक निश्चित झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना हा १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात होणार आहे. ''कोविड-१९ दृष्टीने आम्ही प्रत्येक ठिकाणांवर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत. दरम्यान अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही, पण इंदौर आणि हैदराबादेचे स्टेडियम विचारात आहेत. बघुया काय केले पाहिजे, पण खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षिता ही महत्त्वाची आहे'', अशी माहिती इंडियन प्रिमियर लीगचे गव्हर्निंग कौन्सिलने दिली आहे.
आतापर्यंत दिल्ली कॅपिटल, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या चार फ्रँचायझींनी मुंबईत दाखल झाले आहेत. वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात होणाऱ्या उत्कंठावर्धक सामन्याला फक्त सात दिवस बाकी असताना दिल्लीच्या फ्रँचायझीला मोठा झटका बसला. कारण दिल्ली संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल हा कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे.
दरम्यान महाराष्ट्रात शुक्रवारी ४७ हजार ८२७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर शुक्रवारी २०२ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत एका दिवसात ८ हजार ८३२ नवीन रुग्ण आढळले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत रुग्ण वाढीचा आकडा ८ हजार ५०० वरती गेला आहे.