बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये केला नवा विक्रम

ben stokes becomes first player in ipl to hit two centuries while chasing बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा धावांचा पाठलाग करताना नाबाद शतक करण्याची किमया साधली.

ben stokes becomes first player in ipl to hit two centuries while chasing
बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये केला नवा विक्रम 

थोडं पण कामाचं

  • बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये केला नवा विक्रम
  • धावांचा पाठलाग करताना स्टोक्सने दोनवेळा केले नाबाद शतक
  • आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक करणाऱ्यांमध्ये स्टोक्स आघाडीवर

अबुधाबी: बेन स्टोक्सच्या शानदार शतकामुळे क्रिकेटप्रेमींचा सुपर संडे मजेत साजरा झाला. स्टोक्सने आयपीएलच्या करिअरमधले दुसरे शतक केले. राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेल्या बेन स्टोक्सने ४५व्या लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध धावांचा पाठलाग करताना नाबाद शतक केले. धावांचा पाठलाग करताना नाबाद शतके झळकावण्याच्या बाबतीत बेन स्टोक्स आयपीएलमध्ये आघाडीवर आहे. त्याने दोन वेळा ही कामगिरी केली तर इतर १६ फलंदाजांनी प्रत्येकी १ वेळा धावांचा पाठलाग करताना शतक केले. स्टोक्सच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. (ben stokes becomes first player in ipl to hit two centuries while chasing)

स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच ८ विकेट राखून जिंकली. स्टोक्सच्या मॅच विनिंग इनिंगमुळे राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२०च्या 'प्ले ऑफ'मध्ये दाखल होण्याची शक्यता कायम आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये बेन स्टोक्सने ६० चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकारांचा पाऊस पाडून नाबाद १०७ धावा केल्या. स्टोक्सने १७८.३३च्या अप्रतिम स्ट्राईक रेटने खेळत धावा केल्या. याआधी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १९५ धावा केल्या. मुंबईने दिलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या बेन स्टोक्सने नाबाद १०७ तर संजू सॅमसनने नाबाद ५४ धावा केल्या. स्टोक्स आणि सॅमसनच्या १५२ धावांच्या भागीदारीमुळे राजस्थान रॉयल्सने ही मॅच १८.२ ओव्हरमध्येच जिंकली. संजू सॅमसनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ५४ धावा केल्या.

विशेष म्हणजे बेन स्टोक्सने आयपीएलच्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा धावांचा पाठलाग करताना नाबाद शतक केले. याआधी स्टोक्सने २०१७ मध्ये गुजरात लायन्स विरुद्धच्या मॅचमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटतर्फे खेळत धावांचा पाठलाग करताना शतक केले होते. गुजरात लायन्सने १६२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना स्टोक्सने ६३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकार मारत नाबाद १०३ धावा केल्या होत्या. या मॅचमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटने १९.५ ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. त्यांनी ५ विकेट राखून मॅच जिंकली होती.

बेन स्टोक्सच्या अप्रतिम कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सने मॅच जिंकली आणि १० पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये सहावे स्थान राखले. आणखी दोन लीग मॅच जिंकल्यास 'प्ले ऑफ'मध्ये दाखल होण्याची संधी राजस्थान रॉयल्सला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स 'प्ले ऑफ'मध्ये दाखल होण्याची शक्यता मावळली. 

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी १४ पॉइंट्स आहेत. रनरेटच्या आधारे पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स १२ पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाब १० पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटमुळे पाचव्या स्थानावर तर राजस्थान रॉयल्स १० पॉइंट्ससह सहाव्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद ८ पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटमुळे सातव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपरकिंग्स ८ पॉइंट्ससह शेवटच्या, आठव्या स्थानावर आहे.

आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन टीमच्या प्रत्येकी १२ लीग मॅच खेळून झाल्या आहेत. त्यांना प्रत्येकी २ लीग मॅच खेळायच्या आहेत. तर बाकीच्या सर्व टीमच्या प्रत्येकी ११ लीग मॅच खेळून झाल्या आहेत. त्यांना प्रत्येकी ३ लीग मॅच खेळायच्या आहेत. आज (सोमवार, २६ ऑक्टोबर २०२०) पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पाचव्या स्थानावरील किंग्स इलेव्हन पंजाब यांची मॅच होणार आहे. दोन्ही टीमची ही बारावी लीग मॅच आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी