IPL Rating Down | मुंबई : अलीकडे जगातील सर्वात प्रसिध्द असलेल्या टी-२० लीगला सुरूवात झाली आहे. यंदा आयपीएलचा हा १५ वा हंगाम महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये पार पडत आहे. नेहमीप्रमाणे क्रिकेट वर्तुळातील मोठा वर्ग आयपीएलची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. स्टेडियमवर, प्रत्यक्षात अथवा मोबाईलवर, जिथून शक्य होईल तिथून चाहते आयपीएलशी जोडले जातात. चाहत्यांच्या या प्रेमामुळे बीसीसीआयला देखील मोठा फायदा होत असतो. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये चाहत्यांनी बीसीसीआयला निराश केले आहे. (Big blow to BCCI from fans The rating of IPL is declining day by day).
अधिक वाचा : कर्मचारी सिल्हर ओकवर जाणार असल्याचं पोलिसांना होतं ठाऊक,पण..
आयपीएलच्या १५ व्या हंगामात आतापर्यंत एकूण १६ सामने खेळवले गेले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरूवात २६ मार्च पासून झाली. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएल सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंगमध्ये तब्बल ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच बीसीसीआयला लवकरच २०२३-२७ च्या हंगामापर्यंतचे मीडिया राईट्स विकायचे आहेत. हे पाहता रेटिंग कमी होणे हा बीसीसीआयला मोठा झटका असू शकतो.
BARC ने 26 मार्च ते एक एप्रिलपर्यंचा डेटा जाहीर केला आहे. या कालावधीत आयपीएल २०२२ चे एकूण ८ सामने खेळवले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, या ८ सामन्यांमध्ये टीव्ही रेटिंग २.५२ एवढे होते. मागील हंगामाच्या तुलनेत २०२१ मध्ये पहिल्या आठवड्यात हे रेटिंग ३.७५ एवढे होते. तर २०२० मधील पहिल्या आठवड्याचे टीव्ही रेटिंग ३.८५ एवढे असल्याची नोंद आहे.
अधिक वाचा : शंभर रुपयांच्या इंधनावर महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ रूपयांचा कर
टीव्ही रेटिंग कमी झाल्याने याचा बीसीसीआयला फटका बसला आहे मात्र याबरोबर प्रेक्षकांच्या तुलनेत देखील घट झाली आहे. यावेळीच्या हंगामात पहिल्या आठवड्यात १४ टक्के प्रेक्षकांची कमी होती म्हणजेच २२९.०६ दशलक्ष लोकांनी सर्व चॅनेलद्वारे आयपीएलचे सामने पाहिले. तर मागील वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये २६७.७ दशलक्ष प्रेक्षकांनी आयपीएलचे सामने पाहिले होते.
आयपीएल २०२२ चे आयोजन महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरांतील स्टेडियमवर आयपीएलचे साखळी सामने खेळवले जातील असे बीसीसीआयने आयपीएलच्या आधी स्पष्ट केले आहे. मात्र जाणकारांच्या म्हणण्यानुसार आयपीएलच्या प्रेक्षकांमध्ये घट होण्याचे हे एक प्रमुख कारण असू शकते. कारण बाहेरील राज्यातील सर्वच प्रेक्षकांना याचा प्रत्यक्षात आनंद घेता येत नाही. यापूर्वी आयपीएलचे सामने भारतातील विविध शहरांमध्ये खेळवले जायचे.