आयपीएल,नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करण्यास तयार आहे. पुजारा दीर्घकाळापासून आयपीएलमध्ये खेळलेला नाही, परंतु या हंगामासाठी एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने त्याला खरेदी केले आहे. पुजाराही आयपीएलमधील पुनरागमनाविषयी उत्सुक आहे.
पुजाराने आयपीएलमध्ये आपला शेवटचा सामना २०१४ मध्ये खेळला होता. तो गेल्या सात वर्षांपासून या लीगपासून बाहेर आहे. पण यावेळी मात्र चेन्नईने पुजारावर विश्वास दाखवत त्याला आपल्या संघात घेतले आहे. पुजाराही चेन्नई सुपर किंग्सच्या विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो सरावामध्ये जीव ओतत आहे.
या आयपीएल हंगामात चेतेश्वर पुजाराला आपल्या खेळाची प्रतिमा बदलून टाकायची आहे. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये धिम्या गतीने फलंदाजी करणाऱ्या पुजाराला आयपीएल २०२१ मध्ये तडाखेबाज फलंदाजी करायची आहे. याच कारणाने त्याने आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल केला आहे. दरम्यान चेतेश्वर पुजाराच्या या नव्या शैलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात पुजारा नेटमध्ये सराव करत असून तो चौके आणि षटकारांचा पाऊस पाडत आहे. दरम्यान एका क्रिकेट रसिकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पुजारा सराव अभ्यास करत असून तो मोठं- मोठे फटके मारत आहे. पुजाराने दीपक चहर, कर्ण शर्मा, आणि थ्रो डाऊन विशेषज्ञवर लांबलचक षटकार मारले.
आयपीएल करिअरमध्ये पुजाराच्या नावावर ३० सामन्यात ३९० धावा आहेत. दरम्यान त्याने या धावा १०० पेक्षा कमी स्ट्राइक रेटने केल्या आहेत. आपल्या धिम्या गतीच्या फलंदाजीमुळे चेतेश्वर पुजारा मागील वर्षाच्या लिलावात अनसोल्ड राहिला.
टी२० क्रिकेटमध्ये पुजाराच्या नावावर एका शतकाची नोंद आहे. त्याने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ६१ चेंडूत नाबाद राहून १०० धावा केल्या होत्या. यादरम्यान पुजाराने १४ चौकार आणि एक षटकार लगावला होता. एकंदरीत टी२० क्रिकेटच्या ६४ सामन्यांमध्ये १०९.३५ च्या स्ट्राइक रेटने पुजाराच्या नावावर १३५६ धावा आहेत. यात ७ अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.