आयपीएलवर घोंगावत आहे कोरोनाचे संकट, २ खेळाडूंना कोरोना

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 04, 2021 | 16:16 IST

Covid scare hits Indian Premier League दिल्ली कॅपिटल्स संघाचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल या दोन खेळाडूंना कोरोना झाला.

Covid scare hits Indian Premier League
आयपीएलवर घोंगावत आहे कोरोनाचे संकट, २ खेळाडूंना कोरोना 

थोडं पण कामाचं

  • आयपीएलवर घोंगावत आहे कोरोनाचे संकट, २ खेळाडूंना कोरोना
  • वानखेडे स्टेडियमचे आठ कर्मचारी कोरोनाबाधीत
  • मुंबईत ज्या संघांचे सामने आहेत ते संघ शहरात दाखल

मुंबईः कोरोना संकटामुळे २०२० ची आयपीएल स्पर्धा भारताबाहेर संयुक्त अरब आमिराती येथे खेळवण्यात आली. आता सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलवर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल या दोन खेळाडूंना कोरोना झाला. तसेच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली. दोन क्रिकेटपटू आणि वानखेडे स्टेडियमचे आठ कर्मचारी यांना कोरोना झाल्यामुळे स्पर्धा सुरू होण्याआधीच आयपीएलचे आयोजन कसे होणार, अशी चर्चा सुरू आहे. (Covid scare hits Indian Premier League)

बीसीसीआय आणि त्यांच्या अखत्यारित असलेले आयपीएलचे गव्हर्निंग काउन्सिल यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन आयपीएल स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले. यंदा आयपीएलचे प्ले ऑफ राउंडचे सामने प्रेक्षकांविना पार पडतील; असे आधीच जाहीर करण्यात आले आहे. मात्र एखाद्या स्टेडियमवर कोरोनाबाधीत कर्मचारी आढळले तर काय उपाय करणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. 

महाराष्ट्रात शनिवारी एका दिवसात ४९ हजार ४४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात शनिवारी २७७ कोरोना मृत्यू झाले. शनिवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ४ लाख १ हजार १७२ जण कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण होते. या संख्येत दर दिवशी होणारी वाढ होत असल्याचे चित्र आहे. यामुळे मुंबईत होणारे आयपीएलचे सामने पर्यायी शहरांमध्ये स्थलांतरित करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

वानखेडे स्टेडियमवर १० ते २५ एप्रिलच्या दरम्यान आयपीएलचे १० सामने खेळवले जाणार असल्याचं वेळापत्रक निश्चित झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना हा १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात होणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने सांगितले. 

आयपीएल स्पर्धा ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. मुंबईत ज्या संघांचे सामने आहेत ते संघ शहरात दाखल झाले आहेत. नियमानुसार संबंधित संघांचे सर्व सदस्य बायो बबलमध्ये आहेत. तसेच कोरोना झालेले दोन क्रिकेटपटू आणि वानखेडेचे कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. 

यंदा पहिल्यांदाच प्रत्येक संघाला प्ले ऑफ राउंडमध्ये त्याचे घरचे मैदान सोडून अन्य चार शहरांतील मैदानांमध्ये खेळावे लागेल. तसेच प्रत्येक संघाला प्ले ऑफ राउंड दरम्यान फक्त तीन वेळाच प्रवास करावा लागणार आहे. प्रवासाकरिता विशेष विमान असेल. विमानतळावर प्रवेश आणि विमानतळावरुन बाहेर पडणे या प्रक्रियेसाठी विशेष व्यवस्था असेल. या पद्धतीने सर्व संघांच्या सगळ्या सदस्यांना कोरोना संकटापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी