IPL 2020 Qualifier 2 DC vs SRH दिल्लीचा विजय, मुंबई विरुद्ध फायनल खेळणार

IPL 2020 DC vs SRH आयपीएलच्या क्वालिफायर टू मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला आणि सनरायजर्स हैदराबादचा पराभव झाला. आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशी फायनल होणार

IPL 2020
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • दिल्लीचा विजय, मुंबई विरुद्ध फायनल खेळणार
  • दिल्ली कॅपिटल्सचा १७ धावांनी विजय
  • मार्कस स्टोइनिस मॅन ऑफ द मॅच

अबुधाबी (Abu Dhabi): आयपीएलच्या (IPL 2020) क्वालिफायर टू (Qualifier 2 Match) मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) विजय झाला आणि सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव झाला. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी फायनल होणार. (Delhi Capitals won by 17 runs)

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० ओव्हरमध्ये ३ बाद १८९ धावा करुन सनरायजर्स हैदराबादला १९० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबाद २० ओव्हरमध्ये ८ बाद १७२ धावा करू शकले. यामुळे क्वालिफायर टू मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा १७ धावांनी विजय झाला. 

दिल्लीसाठी शिखर धवनने शानदार फलंदाजी केली. सलामीला आलेल्या धवनने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार मारत ७८ धावांचे शिखर उभारले. त्याला मार्कस स्टोइनिसने छान साथ देत २७ चेंडूत ३० धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. स्टोइनिसला राशिद खानने क्लीनबोल्ड केले तर धवनला संदीप शर्माने एलबीडब्ल्यू केले. श्रेयस अय्यर २० चेंडूत २१ धावा करुन जेसन होल्डरच्या चेंडूवर मनिष पांड्येकडे झेल देऊन परतला. यानंतर शिमरॉन हेटमायरने नाबाद ४२ आणि रिषभ पंतने नाबाद २ धावा केल्या. हेटमायरने २२ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारत ४२ धावा केल्यामुळे दिल्लीला अंतिम ओव्हरमध्ये वेगाने धावा वाढवणे शक्य झाले.

धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबाद २० ओव्हरमध्ये ८ बाद १७२ धावा करू शकले. दिल्लीच्या कगिसो रबाडाने ४ ओव्हरमध्ये २९ धावा देत सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, अब्दुल समद, राशिद खान आणि श्रीवत्स गोस्वामी या चौघांना बाद केले. मार्कस स्टोइनिसने ३ ओव्हरमध्ये २६ धावा देत सलामीवीर प्रियम गर्ग, मनिष पांड्ये आणि अर्धशतकवीर केन विल्यमसन या तिघांना बाद केले. अक्षर पटेलने जेसन होल्डरला बाद केले.

फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादकडून केन विल्यमसनने सर्वाधिक ६७ धावा केल्या. प्रियम गर्ग १७, डेव्हिड वॉर्नर २, मनिष पांड्ये २१, जेसन होल्डर ११, अब्दुल समद ३३, राशिद खान ११, श्रीवत्स गोस्वामी शून्य धावा करुन परतले. शाहबाझ नदीम आणि संदीप शर्मा प्रत्येकी २ धावा करुन नाबाद राहिले.

मार्कस स्टोइनिस मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने दिल्लीकडून फलंदाजी करताना २७ चेंडूत ३० धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. तसेच गोलंदाजी करताना ३ ओव्हरमध्ये २६ धावा देत सलामीवीर प्रियम गर्ग, मनिष पांड्ये आणि अर्धशतकवीर केन विल्यमसन या तिघांना बाद केले.

पराभूत झाल्याममुळे सनरायजर्स हैदराबादचे आयपीएल २०२० स्पर्धेतील आव्हान संपले. आता मंगळवारी आयपीएल २०२० स्पर्धेची फायनल मॅच रंगणार आहे. या मॅचमध्ये यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीम समोरासमोर येतील. ही मॅच दुबईत होणार आहे.

कोरोना संकटामुळे अनेक बंधनं पाळून १९ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेची दिमाखदार सांगता दुबईतील फायनल मॅचने होईल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना वाटत आहे. ही मॅच दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी