IPL 2022 Playoff Schedule In Marathi | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. आयपीएल २०२२ मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांचा निर्णय शनिवारी मुंबई इंडियन्सच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयाने झाला. मुंबई इंडियन्सच्या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडले. आरसीबीचा संघ लीग फेरी संपण्याच्या एक पाऊल आधी प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. (Find out which team will face when and with whom in the IPL playoffs).
अधिक वाचा : औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राजकारणासाठी जिवंत
गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आयपीएलमध्ये आपला पहिला हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने १४ पैकी १० सामने जिंकून पहिले स्थान पटकावले. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने १४ सामन्यांपैकी ९ विजयांसह दुसरे स्थान पटकावले आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने १४ पैकी ९ सामने जिंकून तिसरे स्थान पटकावले. तसेच आरसीबीने १४ पैकी ८ विजयांसह चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफ गाठण्यात यश मिळविले.
दरम्यान, अशा परिस्थितीत प्लेऑफमध्ये कोणाचा सामना कोणाशी होणार हे समोर आले आहे. २४ मे रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. लक्षणीय बाब म्हणजे या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची दुसरी संधी मिळणार आहे. यासाठी त्याला एलिमिनेटर सामन्यात विजेत्या संघाचा सामना करावा लागणार आहे.
एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना २५ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २७ मे रोजी पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाशी भिडेल.
अंतिम सामना २९ मे रोजी पहिल्या आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील विजेत्या संघांविरुद्ध होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.