नवी दिल्ली : कोरोना साथीच्या दरम्यान आयपीएलचा १३ वा सीझन यूएईमध्ये यशस्वीरित्या पार पडला. हा सीझन अनेक कारणांनी सर्वात प्रेक्षणीय सीझन ठरला. शेवटच्या साखळी सामान्यांपर्यंत टॉप ४ संघ जाहीर न होणे, एकाच मॅचमध्ये दोन सुपर ओव्हर होणे, खूप सामन्यांचे निकाल सुपर ओव्हरमध्ये ठरणे, या आणि अशा अनेक रोमांचक गोष्टी IPLच्या १३व्या हंगामात घडल्या. दरम्यान या हंगामात बऱ्याच दिग्गज खेळाडूंना आपल्या खेळाला साजेल अशी खेळी खेळता आली नाही. काही खेळाडू असेही आहेत की ज्यांना जास्त किंमत देऊन आपल्या संघात समाविष्ट केले पण त्यांना पूर्ण हंगामात एकदाही संधी दिली गेली नाही.
ग्लेन मॅक्सवेल या अशाच दिग्गज खेळाडूला यंदाच्या IPL हंगामात प्रभाव पाडता आला नाही. किंग्स इलेव्हन पंजाबने मॅक्सवेलसाठी तब्बल १० कोटी रुपये मोजले. संपूर्ण हंगामात त्याला खेळण्यासाठी भरपूर संधी दिली, पण मॅक्सवेलला संधीचं सोनं करता आले नाही. त्याच्या खेळाला साजेशी कामगिरी त्याच्याकडून झाली नाही आणि म्हणूनच त्याच्यावर बरीच टीकासुद्धा झाली. या टीकाकारांमध्ये भारताचा स्फोटक फलंदाज आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागचाही समावेश आहे. त्याने मॅक्सवेलवर जोरदार टीका केली. वीरूने आपल्या अनोख्या शैलीत मॅक्सवेलची खिल्ली उडवली.
वीरेंद्र सेहवाग आजकाल 'वीरू की बैठक' नावाचा एक सोशल मिडियावरील एक शो चालवत आहे. या शोमध्ये वीरूने आयपीएल पासून क्रिकेटमधील बऱ्याच गोष्टींबाबतीत स्प्ष्ट मते मांडली आहेत. आपल्या अनोख्या शैलीत वीरू या शोमध्ये टिपण्णी करीत असतो. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये वीरूने आयपीएलच्या तेराव्या हंगामातील टॉप ५ फ्लॉप खेळाडूंवर टिपण्णी केली आहे. या टॉप ५ फ्लॉप खेळाडूंच्या लिस्ट मध्ये ग्लेन मॅक्सवेलचाही वीरूने समावेश केला. वीरूने आपली जुनी टीम किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेलला लक्ष्य केले. वीरू म्हणाला, ' ग्लेन मॅक्सवेल हा १० कोटी रुपयांचा चिअरलिडर पंजाब संघाला खूपच महाग पडला. मागचे काही सीझन त्याने फार सुमार कामगिरी केली पण या सीझनमध्ये त्याने सुमार कामगिरीचे रेकॉर्ड तोडले. यालाच आम्ही एक महाग सुट्टी म्हणतो ज्यासाठी खर्चपण करावा लागला नाही.'
वीरूने टॉप ५ फ्लॉप खेळाडूंमध्ये डेल स्टेन, शेन वॉटसन, एरॉन फिंच, आंद्रे रसेल या दिग्गज खेळाडूंचाही समावेश केला. डेल स्टेनवर टीका करताना वीरू म्हणाला की, या सीझनला स्टेन गनऐवजी 'देशी बंदूकी'चा आवाज आला, एकेकाळचा फलंदाजांचा कर्दनकाळ स्टेन या सीझनमध्ये फ्लॉप ठरला. एरॉन फिंच, शेन वॉटसन या ऑस्ट्रेलियन दिग्गजांवरसुद्धा वीरूने खरमरीत टीका केली. आंद्रे रसेलच्या मसल्स यावेळी आपला प्रभाव पडू शकल्या नाहीत, सीझनच्या प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा असताना त्याने अपेक्षाभंग केला. रसेल फ्लॉप ठरल्यामुळे KKR प्ले ऑफमध्ये आपले स्थान बनवू शकली नाही, असे वीरूने रासेलवर टीका करताना नमूद केले.
शोच्या याच एपिसोडमध्ये वीरूने आयपीएलच्या तेराव्या हंगामातील टॉप ५ हिट खेळाडूंचीसुद्धा लिस्ट सांगितली. या लिस्ट मध्ये वीरूने या हंगामातील महागाडे खेळाडू ज्यांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली त्यांची प्रसंशा केली आहे. वीरेंद्र सेहवागने या टॉप ५ हिट खेळाडूंच्या लीस्टमध्ये जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल, कागिसो रबाडा, हार्दिक पांड्या आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश केला होता.