IPL 2020 Schedule, Time Table: आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा 'पहिला सामना' कुणाचा

IPL 2020
रोहित गोळे
Updated Sep 06, 2020 | 17:34 IST

IPL 2020 Schedule, Time Table in Marathi: बीसीसीआयने अखेर आगामी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळविण्यात येणार आहे.

Rohit_Dhoni_IPL_BCCI
आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक जाहीर  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • बीसीसीआयने आयपीएल 2020 चे संपूर्ण वेळापत्रक केले जाहीर
  • आयपीएल -13 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स आमने-सामने
  • यंदाची आयपीएल स्पर्धा रंगणार यूएईमध्ये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अखेर बर्‍याच घडामोडीनंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2020 चे संपूर्ण वेळापत्रक (IPL 2020 Schedule) जाहीर केले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा आधीच पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता या स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला असून याचं आयोजन यूएईमध्ये (UAE) १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

आयपीएलचे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजा येथे खेळविण्यात येणार आहे. यावर्षी आयपीएल-13 चा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळविला जाणार आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, चेन्नई सुपर किंग्ज कॅम्पमध्ये कोविड-१९ चे रुग्ण वाढल्याने कार्यक्रम जाहीर करण्यास उशीर झाला. आधीच्या वेळापत्रकानुसार गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार होता, तो कायम ठेवण्यात आला आहे. या दोघांमधील सामन्यासोबतच या स्पर्धेलाही सुरुवात होणार आहे.

आयपीएल 2020 चे संपूर्ण वेळापत्रक 

यूएईमध्ये संपूर्ण आयपीएलचं आयोजन करण्यात आलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आशा व्यक्त केली आहे की, आयपीएल 2020 यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकेल. दरम्यान, चेन्नईच्या दोन खेळाडूंसह एकूण १३ सदस्यांना चेन्नई सुपरकिंग्जमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आणि त्यामुळेच बीसीसीआयला त्यांचे वेळापत्रक बदलावे लागले. सर्व फ्रॅन्चायझींनी १ सप्टेंबरपासून सराव सुरू केला आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ आजपासून (६ सप्टेंबर)  सराव सुरू करणार आहे. तर त्यांचे दोन खेळाडू हे क्वॉरंटाइन कालावधी संपल्यानंतर म्हणजेच १२ सप्टेंबरला संघात सामील होतील.

यावर्षी या स्पर्धेत १० डबल-हेडर (एका दिवसात दोन सामने) असणार आहे. डबल हेडर्सच्या दिवशीचे सामने हे अर्धा तास आधीच सुरू होतील. यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारकडून बीसीसीआयला अधिकृत परवानगी आधीच  मिळाली होती. गेल्या वर्षी अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला १ रनने पराभूत केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी