IPL 2019: पायातून रक्त येत असूनही शेन वॉटसन खेळत राहिला!

IPL 2019
Updated May 14, 2019 | 11:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2019: शेन वॉटसनची ५९ बॉल्समधील ८० रन्सची खेळी खरंच जिगरबाज होती. जिगरबाज एवढ्यासाठी की, डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असताना त्यातून रक्त वाहत असतानाही वॉटसन संघासाठी मैदानावर होता. दुदैवाने तो रन आऊट झाला.

Shane Watson
शेन वॉटसन  |  फोटो सौजन्य: Instagram

हैदराबाद : आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईच्या शेन वॉटसनने एकाकी झुंज देऊन टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याची ती खेळी व्यर्थ ठरली. टीमला विजयासाठी दोन रन्स कमी पडल्या. पण, वॉटसनची ५९ बॉल्समधील ८० रन्सची खेळी खरंच जिगरबाज होती. जिगरबाज एवढ्यासाठी की, डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असताना त्यातून रक्त वाहत असतानाही वॉटसन संघासाठी मैदानावर होता. दुर्दैवाने तो रन आऊट झाला आणि चेन्नईच्या हातात आलेली मॅच मुंबईने अक्षरश: हिसकावून घेतली. महत्त्वाचं म्हणजे, वॉटसनला मॅचनंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यात त्याला सहा टाके घालावे लागले आहेत. हरभजनसिंगने आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवर हा सगळा खुलासा केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वॉटसनच्या खेळीचे आणखीनच कौतुक होऊ लागले आहे.

काय म्हणाला हरभजन?

हरभजनने इंस्‍टाग्राम स्टोरीवर वॉटसनचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात वॉटसनच्या डाव्या पायाला गुडघ्याच्यावर रक्त आल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये हरभजन म्हणला आहे की, तुम्हाला त्याच्या गुडघ्यावर रक्त दिसत आहे का? मॅचनंतर त्याला सहा टाके पडले आहेत. डाइव्ह मरताना तो जखमी झाला होता. पण, त्याने जिद्द सोडली नाही तो टीमसाठी मैदानावर उभा होता. शेन वॉटसनने मॅच चेन्नईच्या हातात आणून दिली होती. पण, शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला ९ रन्स हव्या होत्या. मुंबई इंडियन्सच्या अनुभवी लसिथ मलिंगाने त्या ९ रन्सचे यशस्वीरित्या संरक्षण केले आणि मॅच मुंबई इंडियन्सच्या खात्यात गेली.

‘बेनिफिट ऑफ डाऊट धोनीला द्यायला हवा होता’

आयपीएलच्या फायलनमध्ये चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी रन आऊट झाला. पण, त्याला रन आऊट घोषित करण्याच्या निर्णयावर चेन्नईचे समर्थक नाखुश होते. हरभजननेही धोनीला आऊट देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, ‘धोनीबाबतचा निर्णय आमच्या बाजूने लागावा, अशी आमची अपेक्षा होती. वेगवेगळ्या अँगलने पाहिले तर, एका अँगलमध्ये धोनी आऊट दिसत होता. तर एका अँगलमध्ये नॉट आऊट दिसत होता. बेनिफिट ऑफ डाऊट कायम बॅट्समनच्या बाजूने दिला जातो. तो धोनीला द्यायला हवा होता. आमच्या पराभवामागील कारणांमध्ये धोनीबाबतचा निर्णय हे एक कारण होते. त्याचबरोबर आमच्याकडून चांगल्या पार्टनरशिप झाल्या नाहीत. वॉटसनने एकट्याने प्रयत्न करून सामना आमच्या बाजूने आणला होता. पण, ते प्रयत्न पुरेसे नव्हते. धोनी आऊट झाल्यानंतरही आम्ही टार्गेटजवळ पोहोचलो होतो. वॉटसनमुळेच ते शक्य झाले होते.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी