जयपूर: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात एक घटना पुन्हा पाहायला मिळाली. या घटनेमुळे तो गोलंदाज पुन्हा निराश झाला. जोफ्रा आर्चरचा बॉल स्टम्पला लागला मात्र बेल्स पडल्या नाहीत आणि फलंदाजाला खेळण्याची संधी मिळाली. सध्याच्या आयपीएलमध्ये अशा अनेक घटना बघायला मिळाल्या आहेत. आता राजस्थान रॉयल्सचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा या घटनेचा बळी ठरला.
ही घटना १६व्या ओव्हरमध्ये घडली. पृथ्वी शॉने आर्चरचा फुलटॉस बॉल न खेळता सोडून दिला आणि हा बॉल स्टम्पला लागून विकेटकीपर सॅमसनकडे गेला. मात्र यावेळी बेल्स खाली पड्ल्या नाहीत. यामुळे आर्चर खूपच निराश झाला.
आर्चरसोबत दुसऱ्यांदा हे घडले आहे. त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. पृथ्वी शॉ आधी आर्चरने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही असेच बाद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळीही बेल्स खाली पडल्या नाहीत. आर्चरच्या बॉलवर धोनीने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र बॉल स्टम्पला लागला आणि बेल्स खाली पडल्या नाहीत. केवळ स्टम्पची लाईट चमकली.
याशिवाय शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील सामन्यादरम्यानही असेच दृश्य पाहायला मिळाले. उमेश यादवच्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसला जीवदान मिळाले. उमेशचा बॉल ऑफ स्टम्पवर लागला. मात्र बेल्स खाली पडल्या नाहीत. दरम्यान इलेक्ट्रिक वायरिंगया बेल्सचे वजन वाढलेले आढळले. साधारण बेल्सच्या तुलनेत या वजनदार आहेत. त्यामुळेच की काय बेल्स न पडण्याच्या इतक्या घटना समोर येत आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी आयपीएलच्या १२व्या हंगामातील ४०व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला ६ विकेटनी मात दिली. ऋषभ पंत(७८) आणि शिखर धवन(५४) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीने १९२ धावांचे भलेमोठे आव्हान ४ बॉल राखून पूर्ण केले.