IPL 2019: धोनी पुढचा आयपीएल सिझन खेळणार की नाही?

IPL 2019
Updated May 13, 2019 | 20:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2019: सध्या ३७ वर्षांचा असलेला महेंद्रसिंह धोनी वर्ल्डकपनंतर कोणत्याही क्षणी आपल्या निवृत्तीची घोषणा करू शकतो. त्यामुळं तो पुढचा आयपीएल सिझन खेळणार की नाही, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

MS Dhoni
महेंद्रसिंह धोनी पुढचा आयपीएल सिझन खेळणार?  |  फोटो सौजन्य: Twitter

हैदराबाद : भारताचा विकेटकीपर आणि चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या रिटायरमेंटची चिंता त्याला जेवढी नाही तेवढी इतरांना आहे. प्रत्येक मोठ्या स्पर्धेनंतर धोनी रिटायर होणार असल्याच्या चर्चेला ऊत येतो. आगामी वर्ल्ड कपनंतर तो इंटरनॅशनल वन-डेमधून निवृत्त होईल, असा अंदाजही लावला जात आहे. आता इंटरनॅशनल बरोबरच आयपीएलमधूनही धोनी बाहेर पडेल, अशी शंका उपस्थित केली जात आहे. काल (रविवार १२मे) धोनीच्या संघाला रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सकडून एका धावेने पराभव पत्करावा लागला. एक अत्यंत रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सनं बाजी मारली. मॅच अतिशय रंगतदार झाली असली तरी, धोनीसाठी त्या मॅचचा निकाल निराशाजनक होता. चेन्नईच्या संघाला आणखी चांगली कामगिरी करणं शक्य होतं, असं मत धोनीनं व्यक्त केलंय.

धोनीच्या चाहत्यांना आशा

मॅचनंतर सामन्यातील कामगिरीविषयी धोनीने प्रतिक्रिया दिली. त्यात धोनी म्हणाला, ‘आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. खूप इंटरेस्टिंग आहे की, आम्ही एकमेकांना ट्रॉफी पास करत आहोत. मॅचमध्ये दोन्ही संघांनी अक्षम्य चुका केल्या. फक्त मुंबई इंडियन्सने एक चूक कमी केली आणि त्यांना विजय मिळाला.’ पुढचा आयपीएल सिझन खेळणार का, असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला. त्यात धोनी म्हणाला, ‘पुढच्या वर्षाबाबत आताच काही बोलणे कठीण आहे. पुढची स्पर्धा वर्ल्ड कप आहे. त्यामुळे त्याला प्राधान्य देत आहे. त्यानंतर आम्ही चेन्नई सुपर किंग्जचा विचार करू. मला आशा आहे की पुढच्या वर्षी भेट होईल.’ धोनीच्या शेवटच्या वाक्यामुळे त्याच्या चाहत्यांना धोनी पुढचा सिझन नक्की खेळेल अशी आशा आहे.

धोनीवर मोठी जबाबदारी

महेंद्रसिंह धोनीवर वर्ल्डकपमध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू म्हणून धोनी मैदानात उतरणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आजवर तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात २००७मधील टी-२० वर्ल्ड कप, २०११मध्ये भारतात झालेला क्रिकेट वर्ल्ड कप आणि २०१३ची इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश आहे. यावेळी भारताची टीम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे विराटला धोनीच्या अनुभवाची गरज लागणार आहे. त्यामुळे धोनी इंग्लंडमध्ये संघाचा कणा असणार आहे.

मुंबईचा दबदबा

आजवरच्या आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद मिळवण्याचा मान आता मुंबई इंडियन्सला मिळाला आहे. मुंबई आणि चेन्नई सुपरकिंग्जने प्रत्येक तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. मात्र, कालच्या मॅचनंतर मुंबईने चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. कालची मॅच खूपच चुरशीची झाली. शेवटच्या बॉलपर्यंत पारडं दोन्ही टीमकडं होतं. मुंबईच्या लसिथ मलिंगाने शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेऊन मॅच खिशात टाकली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...