IPL 2020 46 Match KKR vs KXIP किंग्स इलेव्हन पंजाबचा ८ विकेट राखून विजय

IPL 2020 46 Match KKR vs KXIP केकेआरने दिलेले १५० धावांचे आव्हान सहज पूर्ण करुन किंग्स इलेव्हन पंजाबने ८ विकेट राखून मॅच जिंकली.

IPL 2020
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • किंग्स इलेव्हन पंजाबचा ८ विकेट राखून विजय
  • कोलकाताने पंजाबला दिलेले १५० धावांचे आव्हान
  • मनदीप सिंह नाबाद ६६, ख्रिस गेल ५१ धावा

शारजा (Sharjah): केकेआरने दिलेले १५० धावांचे आव्हान सहज पूर्ण करुन किंग्स इलेव्हन पंजाबने ८ विकेट राखून मॅच जिंकली. (Kings XI Punjab won by 8 wickets)

किंग्स इलेव्हन पंजाबने छान सुुरुवात केली. सलामीवीर के एल राहुल २५ चेंडूत ४ चौकारांसह २८ धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. पण दुसरा सलामीवीर मनदीप सिंह याने नाबाद राहून विजयात मोठी भूमिका बजावली. मनदीप सिंहने ५६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ६६ धावा केल्या. त्याला ख्रिस गेलने उत्तम साथ दिली. गेलने फक्त २९ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकार अशी तुफान फटकेबाजी करत ५१ धावा केल्या. तो लोकी फर्ग्युसनच्या चेंडूवर प्रसिध कृष्णाकडे झेल देऊन परतला. निकोलस पूरनने नाबाद २ धावा केल्या. 

किंग्स इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धची मॅच ८ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे १२ पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटसह किंग्स इलेव्हन पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी झाले. आता पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तीन टीमचे प्रत्येकी १४ पॉइंट्स आहेत. रनरेटच्या आधारे मुंबई इंडियन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाब १२ पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. आधी चौथ्या स्थानावर असलेली कोलकाता नाईट रायडर्सची टीम १२ पॉइंट्ससह पाचव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स १० पॉइ्ट्ससह सहाव्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद ८ पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटसह सातव्या स्थानावर तर चेन्नई सुपरकिंग्स ८ पॉइंट्ससह शेवटच्या, आठव्या स्थानावर आहे. 

कोलकाताने पंजाबला दिले १५० धावांचे आव्हान

आयपीएलच्या ४६व्या लीग मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करुन २० ओव्हरमध्ये ९ बाद १४९ धावा केल्या. केकेआरने किंग्स इलेव्हन पंजाबला १५० धावा करण्याचे आव्हान दिले.

पॉइंट्स टेबलमध्ये सध्या १२ पॉइंट्ससह कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या आणि १० पॉइंट्ससह किंग्स इलेव्हन पंजाब पाचव्या स्थानावर आहे. या मॅचमध्ये केकेआरचा विजय झाल्यास पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या चार टीमचे प्रत्येकी १४ पॉइंट्स होतील. रनरेटच्या आधारे पॉइंट्स टेबलमधील प्रत्येक टीमचे स्थान निश्चित होईल. पण केकेआरचा पराभव झाला तर कोलकाता नाईट रायडर्स पाचव्या तर किंग्स इलेव्हन पंजाब १२ पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटमुळे चौथ्या स्थानावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन्ही टीमसाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना शुभम गिलचे अर्धशतक, इओइन मॉर्गनच्या ४० धावा आणि लोकी फर्ग्युसनच्या नाबाद २४ धावा यांच्या जोरावर १४९ धावांची मजल मारली. शुभम गिलने ४५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार मारुन अर्धशतक केले. नितीश राणा (शून्य धावा), राहुल त्रिपाठी (७ धावा), दिनेश कार्तिक (शून्य धावा), सुनिल नरेन (६ धावा), कमलेश नागरकोटी (६ धावा), पॅट कमिन्स (१ धाव), वरुण चक्रवर्ती (२ धावा) जास्त धावा करण्यात अपयशी ठरले. प्रसिध कृष्णा शून्य धावांवर नाबाद राहिला. 

किंग्स इलेव्हन पंजाबच्या मोहम्मद शामीने ४ ओव्हरमध्ये ३५ धावा देत ३ विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर शुभम गिलसह राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिकला बाद केले. रवी बिश्नोईने ४ ओव्हरमध्ये २० धावा देत इओइन मॉर्गन आणि पॅट कमिन्सला बाद केले. ख्रिस जॉर्डनने ४ ओव्हरमध्ये २५ धावा देत सुनिल नरेन आणि वरुण चक्रवर्तीला बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने नितीश राणाला तर मुरुगन अश्विनने कमलेश नागरकोटीला बाद केले.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी