चेन्नई सुपरकिंग्सचा २० धावांनी विजय

Chennai Super Kings won by 20 runs चेन्नई सुपरकिंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा २० धावांनी विजय

Chennai Super Kings won by 20 runs
चेन्नई सुपरकिंग्सचा २० धावांनी विजय 

थोडं पण कामाचं

  • चेन्नई सुपरकिंग्सचा २० धावांनी विजय
  • चेन्नई सुपरकिंग्स २० ओव्हरमध्ये ६ बाद १६७ धावा
  • सनरायजर्स हैदराबाद २० ओव्हरमध्ये ८ बाद १४७

दुबई (Dubai): चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा २० धावांनी विजय झाला (Chennai Super Kings won by 20 runs). या विजयानंतर चेन्नई सुपरकिंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांचे प्रत्येकी ६ पॉइंट झाले. समान पॉइंट असल्यामुळे धावगतीच्याआधारे पॉइंट्स टेबलमध्ये सनरायजर्स हैदराबाद पाचव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स सहाव्या स्थानावर आहे. उद्या (बुधवारी) दुबईत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांची मॅच होणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स १० पॉइंटसह दुसऱ्या तर राजस्थान रॉयल्स सहा पॉइंटसह सातव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सची धावगती चेन्नई सुपरकिंग्स पेक्षा कमी आहे.

आज झालेल्या मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६७ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादला २० ओव्हरमध्ये ८ बाद १४७ एवढीच मजल मारता आली. मॅचमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाबतीत चमकदार कामगिरी करणारा चेन्नई सुपरकिंग्सचा रविंद्र जाडेजा मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने फलंदाजी करताना १० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार यांच्या जोरावर नाबाद २५ धावा केल्या. तसेच ३ ओव्हरमध्ये २१ धावा देत सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो याला बाद केले.

याआधी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सलामीची जोडी अपयशी ठरली. फाफ डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. सॅम करण ३१ करुन बाद झाला. चेन्नई सुपरकिंग्सकडून शेन वॉसनने सर्वाधिक ४२ धावा केल्या. अंबाती रायुडूने त्याला छान साथ देत ४१ धावा केल्या. धोनी १३ चेंडूत २१ धावा करुन बाद झाला. ब्राव्हो शून्यावर बाद झाला. दीपक चहर दोन धावांवर नाबाद राहिला. सनरायजर्स हैदराबादच्या संदीप शर्माने १९ धावा देत २ विकेट घेतल्या. टी नटराजनने ४१ धावा देत २ विकेट घेतल्या तर खलील अहमदने ४५ धावा देऊन २ विकेट घेतल्या. 

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायजर्स हैदराबादची पहिली विकेट २३ धावांवर गेली. डेव्हिड वॉर्नर ९ धावा करुन परतला तर जॉनी बेअरस्टो २३ धावा करुन बाद झाला. मनिष पांडे ४ धावा करुन धावचीत झाला. केन विल्यमसनने सर्वाधिक ५७ धावा केल्या. पण त्याची कामगिरी संघाचा पराभव टाळू शकली नाही. प्रियम गर्ग १६ तर विजय शंकर १२ धावा करुन बाद झाला. राशिद खान १४ धावांवर स्वयंचीत (हिटविकेट) झाला. शाबाझ नदीमला ब्राव्होने स्वतःच्या चेंडूवर झेलबाद केले. नदीम ५ धावा करुन परतला. संदीप शर्मा १ धाव करुन नाबाद राहिला. चेन्नई सुपरकिंग्सच्या ड्वेन ब्राव्होने २५ धावा देत २ विकेट घेतल्या. करण शर्माने ३७ धावा देऊन २ विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर, सॅम करण आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी