मुंबईचा आठ विकेट राखून विजय

IPL 2020 Match 32 MI vs KKR कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले १४९ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने ८ विकेट राखून सहज पार केले.

IPL 2020 Match 32 MI vs KKR
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • आयपीएलची ३२वी मॅच, MI vs KKR
  • टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये केल्या ५ बाद १४८ धावा
  • मुंबईचा आठ विकेट राखून विजय

अबुधाबी (Abu Dhabi): कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धची मॅच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आठ विकेट राखून १७व्या ओव्हरमध्येच जिंकली. नाबाद ७८ धावा करणारा क्विंटन डीकॉक मॅन ऑफ द मॅच झाला.

याआधी आयपीएल २०२० स्पर्धेच्या ३२व्या लीग मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी २० ओव्हरमध्ये ५ बाद १४८ धावा करुन मुंबई इंडियन्स समोर १४९ धावांचे आव्हान ठेवले. धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने १५व्या ओव्हर अखेर २ बाद १२६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा ३५ आणि सूर्यकुमार यादव १० धावा करुन बाद झाले. सलामीवीर क्विंटन डीकॉकने नाबाद ७८ आणि हार्दिक पांड्याने  नाबाद २१ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून वरुण चक्रवर्तीने सूर्यकुमार यादवला क्लीनबोल्ड केले तर शिवमने कर्णधार रोहित शर्माला दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले. 

डीकॉकचे शानदार अर्धशतक

सलामीली आलेल्या क्विंटन डीकॉकने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या तिघांसोबत भागीदारी केली. त्याने ४४ चेंडूत नाबाद ७८ धावा करताना ९ चौकार आणि ३ षटकारांचा पाऊस पाडला. हार्दिकने तिसऱ्या विकेटसाठी खेळताना ११ चेंडूत नाबाद २१ धावा करत डीकॉकला छान साथ दिली. त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला. 

कोलकाता नाईट रायडर्स ५ बाद १४८ धावा

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये ५ बाद १४८ धावा केल्या. केकेआरकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. याआधी सलामीला आलेली राहुल त्रिपाठी आणि शुभम गिल ही जोडी लवकर परतली. त्रिपाठी सात आणि गिल २१ धावा करुन बाद झाला. नितिश राणा पाच तर दिनेश कार्तिक चार धावा करुन बाद झाला. इओइन मॉर्गनने २९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ३९ धावा केल्या. रसेल १२ धावा करुन बाद झाला. मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरने ४ ओव्हरमध्ये १८ धावा देत सलामीवीर शुभम गिल तसेच दिनेश कार्तिक या दोघांना बाद केले. जसप्रित बुमराहने रसेलला तर ट्रेंट बोल्टने सलामीला आलेल्या त्रिपाठीला बाद केले. नॅथन कूल्टर नाईलने नितिश राणाला बाद केले. 

मुंबई नंबर वन

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मिळालेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्स सर्वोत्तम रन रेट आणि १२ पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर १२ पॉइंट्ससह दिल्ली कॅपिटल्स आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १० पॉइंट्ससह तिसऱ्या तर ८ पॉइंट्ससह कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या तिन्ही संघांचे ६ पॉइंट्स आहेत. रन रेट आधारे सनरायजर्स हैदराबाद पाचव्या, चेन्नई सुपरकिंग्स सहाव्या आणि राजस्थान रॉयल्स सातव्या स्थानावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाब ४ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. 

शनिवारी होणार २ मॅच

शनिवारी घटस्थापनेच्या दिवशी (१७ ऑक्टोबर २०२०) आयपीेलमध्ये दोन मॅच होणार आहे. पहिली मॅच राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल तर दुसरी मॅच दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात रंगणार आहे. या दोन मॅच नंतर पॉइंट्स टेबलमध्ये काय बदल होतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्व टीमच्या प्रत्येकी ८ लीग मॅच झाल्या असून प्रत्येकी ६ लीग मॅच शिल्लक आहेत.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी