कोलकाता नाईट रायडर्सचा 'सुपर' विजय

कोलकाता नाईट रायडर्सने सनराजयर्स हैदराबाद विरुद्धची मॅच सुपर ओव्हरमध्ये जिंकली

IPL 2020
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • आयपीएलची ३५वी मॅच, सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • कोलकाता नाईट रायडर्स २० ओव्हरमध्ये ५ बाद १६३ धावा
  • कोलकाता नाईट रायडर्सचा 'सुपर' विजय

अबुधाबी (Abu Dhabi): कोलकाता नाईट रायडर्सने सनराजयर्स हैदराबाद विरुद्धची मॅच सुपर ओव्हरमध्ये जिंकली. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स दहा गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत तर सनरायजर्स हैदराबाद सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. शानदार गोलंदाजी करणारा लोकी फर्ग्युसन मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने सुपर ओव्हरमध्ये दोन तर आधी सनरायजर्स हैदराबादच्या तिघांना बाद केले. विशेष म्हणजे त्याने सुपर ओव्हरमध्ये दोन आणि डावात दोन अशा चार विकेट क्लीनबोल्ड करुन घेतल्या.

मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६३ धावा केल्या. बरोबरी झाल्यामुळे सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये सनरायजर्स हैदराबाद प्रथम फलंदाजीसाठी आले. कोलकाताकडून लोकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) गोलंदाजी करत होता. त्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले. दुसऱ्या चेंडूवर अब्दुल समदने दोन धावा धावून काढल्या. तिसऱ्या चेंडूवर समद क्लीनबोल्ड झाला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये ३ धावा करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज मैदानात आले.

राशीद खान सनरायजर्स हैदराबादकडून गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर शून्य धावा झाल्या. दुसऱ्या चेंडूवर मॉर्गनने एक धाव काढली. नंतर दिनेश कार्तिकने तिसरा चेंडू खेळून काढला आणि चौथ्या चेंडूवर अर्थात लेग बाय ठरलेल्या चेंडूवर दोन धावा पळून काढल्या. विजयाचा आनंद दिनेश कार्तिकच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

सनरायजर्स हैदराबादने सुपर ओव्हरपर्यंत खेचली मॅच

यंदाच्या आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा सुपर ओव्हरपर्यंत मॅच रंगली. आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स तीन वेळा सुपर ओव्हर खेळून हरले होते. पण यावेळी त्यांनी इतिहास रचला. पहिल्यांदा सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकली. याआधी सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६३ धावा करुन मॅच सुपर ओव्हर पर्यंत नेली. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने ३६ आणि केन विल्यमसनने २९ धावा केल्या. बेअरस्टोने २८ चेंडूत ७ चौकारांसह ३६ धावा केल्या तर विल्यमसनने १९ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारुन २९ धावा केल्या. चांगली सुरुवात झाली पण विल्यमसन लोकी फर्ग्युसनच्या चेंडूवर नितिश राणाकडे झेल देऊन परतला नंतर आलेल्या प्रियम गर्गला लोकी फर्ग्युसनने क्लीनबोल्ड केले. तो ४ धावा करू शकला. बेअरस्टो वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर अँड्रे रसेलकडे झेल देऊन परतला. डेव्हिड वॉर्नरने नाबाद ४७ धावा केल्या. त्याने ३३ चेंडूत ५ चौकार मारत ४७ धावा केल्या.

बेअरस्टो पाठोपाठ फर्ग्युसनने मनीष पांडेला क्लीनबोल्ड केले. तो सहा धावा करू शकला. नंतर सात धावा करणारा विजय शंकर पॅट कमिन्सच्या चेंडूवर शुभम गिलकडे झेल देऊन परतला. तसेच अब्दुल समद १५ चेंडूत २३ धावा केल्यानंतर शिवम मावीच्या चेंडूवर शुभम गिलकडे झेल देऊन परतला. राशिद खान १ धावेवर नाबाद राहिला.

समद फलंदाजीसाठी आला त्यावेळी सनरायजर्स हैदराबादने ५ बाद १०९ अशी मजल मारली होती. समद आणि डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजी करत सोळाव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूपासून १९व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपर्यंत झटपट ३७ धावांची भागीदारी केली. समद बाद झाला. नंतर राशिद खान मैदानात आला. 

आंद्रे रसेल अनफिट असूनही शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला. या ओव्हरचा पहिला चेंडू वाईड गेला. नंतरच्या चेंडूवर राशिदने एक धाव घेतली. पुढच्या ३ चेंडूंवर डेव्हिड वॉर्नरने लागोपाठ तीन चौकार मारले. नंतर दोन धावा काढल्या आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून मॅचमध्ये बरोबरी साधली. कोलकाता नाईट रायडर्सकडून लोकी फर्ग्युसनने तीन तर पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

कोलकाता नाईट रायडर्स २० ओव्हरमध्ये ५ बाद १६३ धावा

सनराजयर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) अबुधाबीत सुरू असलेल्या आयपीएलच्या (IPL 2020) ३५व्या लीग मॅचमध्ये (Match 35) टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) २० ओव्हरमध्ये ५ बाद १६३ धावा केल्या आणि सनराजयर्स हैदराबाद समोर २० ओव्हरमध्ये १६४ धावा करण्याचे आव्हान ठेवले. 

कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीरांनी छान सुरुवात केली. शुभम गिलने ३७ चेंडूत ५ चौकार मारत ३६ धावा केल्या तर राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारुन २३ धावा केल्या. त्रिपाठीला टी नटराजनने क्लीनबोल्ड केले तर राशिद खानच्या चेंडूवर प्रियम गर्गकडे झेल देऊन शुभम गिल परतला. नितिश राणाने २० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारुन २९ धावा केल्या. तो विजय शंकरच्या चेंडूवर प्रियम गर्गकडे झेल देऊन परतला. अँड्रे रसेल ११ चेंडूत १ चौकार मारुन ९ धावा केल्यानंतर बाद झाला. टी नटराजनच्या चेंडूवर विजय शंकरने त्याचा झेल घेतला. इओइन मॉर्गनने २३ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारुन ३४ धावा केल्या. बसिल थम्पीच्या चेंडूवर मनिष पांड्येने त्याचा झेल घेतला. दिनेश कार्तिक १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २९ धावा करुन नाबाद राहिला. 

टी नटराजनने ४ ओव्हरमध्ये ४० धावा देऊन २ विकेट घेतल्या. विजय शंकरने ४ ओव्हरमध्ये २० धावा देऊन एक विकेट घेतली. राशिद खानने ४ ओव्हरमध्ये २८ धावा देऊन एक विकेट घेतली. बसिल थम्पीने ४ ओव्हरमध्ये ४६ धावा देत १ विकेट घेतली. संदीप शर्माने ४ ओव्हरमध्ये २७ धावा दिल्या. टी नटराजन आणि बसिल थम्पीच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढण्यात कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज यशस्वी झाले. 

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी