राजस्थान रॉयल्स ७ विकेट राखून विजयी

IPL 2020 Match 37 CSK vs RR Rajasthan Royals won by 7 wickets चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धची मॅच राजस्थान रॉयल्सने ७ विकेट राखून जिंकली

IPL 2020 Match 37 CSK vs RR Rajasthan Royals won by 7 wickets
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • चेन्नई सुपरकिंग्स - २० ओव्हरमध्ये ५ बाद १२५ धावा
  • राजस्थान रॉयल्स ७ विकेट राखून विजयी

अबुधाबी (Abu Dhabi): चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धची मॅच राजस्थान रॉयल्सने ७ विकेट राखून जिंकली. राजस्थान रॉयल्ससमोर २० ओव्हरमध्ये १२६ धावांचे आव्हान होते. त्यांनी १७.३ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून मॅच जिंकली. राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर मॅन ऑफ द मॅच झाला. बटलरने राजस्थानकडून सर्वाधिक नाबाद ७० धावा केल्या.

धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सलामीची जोडी २६ धावांत फुटली. बेन स्टोक्स ११ चेंडूत १९ धावा काढून दीपक चहरच्या चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. तर दुसरा सलामीवीर रॉबिन उथप्पा फक्त ४ धावा करुन जोश हॅझलवूडच्या चेंडूवर धोनीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ संजू सॅमसन शून्य धावा करुन दीपक चहरच्या चेंडूवर धोनीकडे झेल देऊन परतला. राजस्थान रॉयल्स ३ बाद २८ अशा स्थितीत येऊन पोहोचले. आणखी पडझड होणार असे वाटत असताना स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर मैदानावर पाय रोवून उभे राहिले. या जोडीने अखेरपर्यंत छान खेळी करुन राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. स्टीव्ह स्मिथने नाबाद २६ धावा केल्या. जोस बटलरने ४८ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद ७० धावा केल्या. बटलरच्या कामगिरीची दखल घेत त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. 

चेन्नई सुपरकिंग्स - २० ओव्हरमध्ये ५ बाद १२५ धावा

आयपीएलच्या ३७व्या लीग मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी २० ओव्हरमध्ये ५ बाद १२५ धावा करुन राजस्थान रॉयल्ससमोर (Rajasthan Royals) १२६ धावांचे आव्हान ठेवले. (IPL 2020 Match 37 CSK vs RR Rajasthan Royals won by 7 wickets)

चेन्नई सुपरकिंग्सकडून सलामीवीर सॅम करन २२, फाफ डू प्लेसिस १०, शेन वॉटसन ८, अंबाती रायुडू १३, एम. एस. धोनी २८ धावा करुन बाद झाले. रविंद्र जाडेजाने ३० चेंडूत ४ चौकार मारत नाबाद ३५ धावा केल्या. चेन्नई सुपरकिंग्सकडून सर्वाधिक धावा त्यानेच केल्या. केदार जाधवने नाबाद ४ धावा केल्या. 

राजस्थान रॉयल्सकडून श्रेयस गोपालने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने ४ ओव्हरमध्ये १४ धावा देऊन सलामीवीर सॅम करनची विकेट घेतली. श्रेयसने १२ डॉट बॉल टाकले. राहुल तेवतियाने ४ ओव्हरमध्ये १८ धावा दिल्या आणि रायुडूला बाद केले. जोफ्रा आर्चरने ४ ओव्हरमध्ये २० धावा दिल्या आणि फाफ डू प्लेसिसला बाद केले. कार्तिक त्यागीने ४ ओव्हरमध्ये ३५ धावा दिल्या आणि वॉटसनला बाद केले. चेन्नई सुपरकिंग्सचा धोनी धावचीत झाला. बाकीचे चौघे फलंदाज झेलबाद झाले.

आयपीएलचे पॉइंट्स टेबल

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धची मॅच राजस्थान रॉयल्सने ७ विकेट राखून जिंकल्यामुळे ते १० पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचले तर ६ पॉइंट्स आणि सर्वात कमी रनरेटमुळे चेन्नई सुपरकिंग्स तळाच्या आठव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स १४ पॉइंट्ससह पहिल्या तर मुंबई इंडियन्स १२ पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. मुंबईच्या तुलनेत कमी रनरेटमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १२ पॉइंट्ससह तिसऱ्या तर १० पॉइंट्ससह कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या स्थानावर आहेत. सनरायजर्स हैदराबाद ६ पॉइंट्ससह सहाव्या आणि किंग्स इलेव्हन पंजाब मुंबईला हरवल्यामुळे चेन्नईच्या तुलनेत चांगल्या रनरेटच्या जोरावर ६ पॉइंट्ससह सातव्या स्थानावर आहे.

मंगळवारी कोणाची मॅच?

मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि सातव्या स्थानावर असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब यांची मॅच होणार आहे. ही मॅच दुबईत आहे.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी