KKRचा ५९ धावांनी विजय, वरुण चक्रवर्तीने घेतल्या ५ विकेट

IPL 2020 Match 42 KKR vs DC वरुण चक्रवर्ती आणि पॅट कमिन्सच्या प्रभावी गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धची मॅच गमावली. कोलकाताचा ५९ धावांनी विजय झाला.

IPL 2020
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला दिले १९५ धावांचे आव्हान
  • कोलकाता नाईट रायडर्स - २० ओव्हरमध्ये ६ बाद १९४ धावा
  • KKRचा ५९ धावांनी विजय, वरुण चक्रवर्तीने घेतल्या ५ विकेट

अबुधाबी (Abu Dhabi): वरुण चक्रवर्ती आणि पॅट कमिन्सच्या प्रभावी गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धची मॅच गमावली. कोलकाताचा ५९ धावांनी विजय झाला. (Kolkata Knight Riders won by 59 runs)

धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच चेंडूवर जबर धक्का बसला. अजिंक्य रहाणे शून्य धावा करुन एलबीडब्ल्यू झाला. थोड्याच वेळानंतर शिखर धवन सहा धावा करुन क्लीनबोल्ड झाला. फक्त १३ धावा झाल्या असताना दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सवरील दबावात वाढ झाली. यानंतर श्रेयस अय्यरने ३८ चेंडूत पाच चौकारांच्या जोरावर ४७ धावा केल्या तर ऋषभ पंतने २७ धावा केल्या. पण हे दोघे संघाचा पराभव टाळण्यात अपयशी ठरले. वरुणच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

वरुण चक्रवर्तीने श्रेयस अय्यर (४७ धावा), ऋषभ पंत (२७ धावा), शिमरॉन हेटमायर (१० धावा), मार्कस स्टेनॉइस (६ धावा) आणि अक्षर पटेल (९ धावा) या पाच जणांना बाद केले.  वरुणच्या प्रभावी गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सचे मॅच जिंकण्याचे स्वप्न भंगले. वरुणने ४ ओव्हरमध्ये २० धावा देत ५ विकेट घेतल्या. पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन पाठोपाठ कसिगो रबाडालाही (९ धावा) बाद केले. तुषार देशपांडेला (१ धाव) लॉकी फर्ग्युसनने बाद केले. रविचंद्रन अश्विन १४ तर  एनरिच नॉर्टजे शून्य धावांवर नाबाद राहिला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स पहिल्या दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या, कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या, सनरायजर्स हैदराबाद पाचव्या, किंग्स इलेव्हन पंजाब सहाव्या, राजस्थान रॉयल्स सातव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स आठव्या स्थानावर आहे.

केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला दिले १९५ धावांचे आव्हान

पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders - KKR) आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals - DC) यांच्यातील मॅच अबुधाबी येथे सुरू आहे. आयपीएलच्या (IPL 2020) या ४२व्या लीग मॅचमध्ये टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये ६ बाद १९४ धावा करुन दिल्ली कॅपिटल्सला १९५ धावा करण्याचे आव्हान दिले. (IPL 2020 Match 42 KKR vs DC)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताला ११ धावा झाल्या असताना पहिला धक्का बसला. सलामीवीर शुभम गिल एनरिच नॉर्टजेच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन परतला. त्याने ८ चेंडूत ९ धावा केल्या. पण दुसरा सलामीवीर नितिश राणा विसाव्या ओव्हरपर्यंत टिकला. त्याने ५३ चेंडूत १३ चौकार आणि एक षटकार मारुन ८१ धावा केल्या. विसाव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. मार्कस स्टेनोइसच्या चेंडूवर तुषार देशपांडेने त्याचा झेल घेतला. राहुल त्रिपाठी १३ धावा करुन बाद झाला. त्याला एनरिच नॉर्टजेने क्लीनबोल्ड केले. भरवश्याचा दिनेश कार्तिक फक्त ३ धावा करुन परतला. कसिगो रबाडाने ऋषभ पंतकरवी त्याला झेलबाद केले. नंतर नितिश राणा आणि सुनिल नरेनने डाव सावरला. सुनिल नरेनने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार अशी फटकेबाजी करत ६४ धावा केल्या. नरेनला कसिगो रबाडाने अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले. इओइन मॉर्गन १७ धावा करुन मार्कस स्टेनोइसच्या चेंडूवर कसिगो रबाडाकडे झेल देऊन परतला. दिल्ली कॅपिटल्सच्या एनरिच नॉर्टजे, कसिगो रबाडा आणि मार्कस स्टेनोइस यांनी प्रत्येेकी दोन विकेट घेतल्या.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी