IPL 2020 RCB vs CSK चेन्नईचा ८ विकेट राखून विजय

IPL 2020 RCB vs CSK Chennai Super Kings won by 8 wickets रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात झालेली मॅच सीएसकेने ८ विकेट राखून जिंकली

IPL 2020
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • आरसीबीने चेन्नईला दिले १४६ धावांचे आव्हान
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २० ओव्हरमध्ये ६ बाद १४५ धावा, विराट कोहलीचे अर्धशतक
  • चेन्नई सुपरकिंग्सचा ८ विकेट राखून विजय, ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ६५ धावा

दुबई (Dubai): रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेले १४६ धावांचे आव्हान चेन्नई सुपरकिंग्सने २ विकेट गमावून १८.४ ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि मॅच ८ विकेट राखून जिंकली. ही मॅच जिंकल्यामुळे ८ पॉइंट्ससह चेन्नई सुपरकिंग्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर पोहोचली. (IPL 2020 RCB vs CSK Chennai Super Kings won by 8 wickets)

आजच्या 'सुपर' विजयात ऋतुराज गायकवाडने मोठी भूमिका बजावली. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने ५१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ६५ धावा केल्या. तो मॅन ऑफ द मॅच झाला. फाफ डू प्लेसिसने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २५ धावा केल्या. तो ख्रिस मॉरिसच्या चेंडूवर मोहम्मद सिराजकडे झेल देऊन परतला. अंबाती रायुडूने २७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार मारुन ३९ धावा केल्या. रायुडूला युझवेंद्र चहलने क्लीनबोल्ड केले. धोनीने आणखी पडझड होऊ दिली नाही. त्याने २१ चेंडूत ३ चौकार मारत नाबाद १९ धावा केल्या आणि संघाचा मोठा विजय निश्चित केला. 

थोड्याच वेळात पहिल्या स्थानावरील मुंबई इंडियन्स आणि आठव्या स्थानावरील राजस्थान रॉयल्स यांची मॅच सुरू होत आहे.

असे आहे पॉइंट्स टेबल

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिघांचे १४ पॉइंट्स आहेत. रनरेटच्या आधारे मुंबई इंडियन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स १२ पॉइंट्ससह चौथ्या तर किंग्स इलेव्हन पंजाब १० पॉइंट्ससह पाचव्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या तिघांचे ८ पॉइंट्स आहेत. रनरेटच्या आधारे सनरायजर्स हैदराबाद सहाव्या, चेन्नई सुपरकिंग्स सातव्या आणि राजस्थान रॉयल्स आठव्या स्थानावर आहे.

कोहलीचे अर्धशतक, आरसीबीने चेन्नईला दिले १४६ धावांचे आव्हान

आयपीएलमध्ये (IPL 2020) आज सुपरसंडे आहे. पहिली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आहे. ही ४४वी लीग मॅच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० ओव्हरमध्ये ६ बाद १४५ धावांची मजल मारली आणि चेन्नई सुपरकिंग्सला १४६ धावांचे आव्हान दिले.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने ४३ चेंडूत ५० धावा करताना फक्त १ चौकार आणि १ षटकार मारला. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोहलीने आज सावध खेळी केली. कोहलीला सॅम करणने फाफ डू प्लेसिसकरवी झेलबाद केले. याआधी आरसीबीची सलामीची जोडी ३१ धावांत फुटली. अॅरॉन फिंच १५ धावा करुन तर दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल २२ धावा करुन बाद झाला. एबी डिविलिअर्सने कोहलीला चांगली साथ दिली. डिविलिअर्सने ३६ चेंडूत ४ चौकार मारत ३९ धावा केल्या. मोईन अली १ तर ख्रिस मॉरिस २ धावा करुन परतल्यामुळे आरसीबीला १५० धावांचा टप्पा गाठणे जमले नाही. गुरकीरत मानसिंह ९ आणि वॉशिंग्टन सुंदर ५ धावांवर नाबाद राहिले. चेन्नई सुपरकिंग्सकडून सॅम करणने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्याने अॅरॉन फिंच, विराट कोहली आणि मोईन अली या तिघांना बाद केले. दीपक चहरने एबी डिविलिअर्स आणि ख्रिस मॉरिस या दोघांना बाद केले. मिशेल सेंटनरने एक विकेट घेतली.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी