IPL 2021: सामना हरण्याबरोबरच धोनीला मोठा फटका, या कारणामुळे झाला १२ लाखांचा दंड

IPL 2021
Updated Apr 11, 2021 | 14:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2021: महेंद्र सिंह धोनीला इंडियन प्रिमियर लीग (IPL 2021)मधील सामना खेळताना धीम्या गतीने गोलंदाजी षटकं टाकल्याबद्दल १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

Dhoni to pay Rs 12 lacs fine in IPL
धोनीला आयपीएलमध्ये झाला १२ लाखांचा दंड 

थोडं पण कामाचं

  • महेंद्र सिंह धोनीला इंडियन प्रिमियर लीग (IPL 2021)मधील सामना खेळताना १२ लाख रुपयांचा दंड
  • धीम्या गतीने गोलंदाजी षटकं टाकल्याबद्दल दंड
  • आयपीएलच्या नियमावलीनुसार किमान षटकांशी संबंधित नियमाचे धोनीकडून उल्लंघन

नवी दिल्ली :
IPL 2021: चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात धीम्या गतीने षटकं टाकल्याबद्दल १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपरकिंग्सची आयपीएलमधील सुरूवात डळमळीत झाली आहे. त्यांना ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात सात गडींनी पराभव स्विकारावा लागला.

आयपीएलने प्रसार माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दंड करण्यात आला आहे. त्यांच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल २०२१च्या वानखेडे स्टेडिअमवर १० एप्रिलला झालेल्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केली होती. आयपीएलच्या नियमावलीनुसार किमान षटकांशी संबंधित नियमाचे धोनीकडून उल्लंघन झाले आहे. यासाठी धोनीकडून १२ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 

दिल्ली कॅपिलटल्सने १८९ धावांचा पाठलाग करताना शिखर धवन (८५) आणि पृथ्वी साव (७२) या सलामीवीर जोडीच्या १३८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर सात गडी राखून विजय मिळवला होता.

गोलंदाजांसाठी धडा


चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार धोनीने म्हटले आहे की दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात ढिसाळ गोलंदाजी केल्यानंतर आपल्या चुकांमधून त्यांच्या गोलंदाजांना धडा शिकावा लागणार आहे. विजयासाठीचे १८९ धावांचे लक्ष गाठताना दिल्लीने तीन गडी गमावून आठ चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवला होता. शिखर धवनने ८५ आणि पृथ्वीने ७२ धावा केल्या होत्या.

'आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकला असतो. गोलंदाजांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. गोलंदाजी ढिसाळ होती. त्यांनी यातून धडा घेतला आणि पुढच्या सामन्यांमध्ये ते आपली कामगिरी उंचावतील', असे मत धोनीने सामन्यानंतर व्यक्त केले आहे.

दिल्लीचा नवा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला होता. यावर धोनी म्हणाला की धावपट्टीवरील आद्रतेवर बरंच काही अवलंबून आहे आणि हेच लक्षात घेऊन आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा पयत्न करत होतो.

धोनीचा फॅन असलेला पंत

यादरम्यान दिल्लीच्या पंतने म्हटले आहे की राष्ट्रीय संघातील त्यांचा आदर्श असलेल्या धोनीविरुद्ध सामना खेळणे त्यांच्यासाठी खास होते. पंत म्हणाला, आयपीएलमध्ये कप्तानी करणे आणि धोनीविरुद्ध सामना खेळणे माझ्यासाठी विशेष होते. मी धोनीकडून शिकलो आहे आणि कठीण काळात मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो.
पंत पुढे म्हणाला, सामना जिंकणे हे छान होते. जेव्हा तुम्ही सामना जिंकता तेव्हा सर्वकाही चांगले होते. मधल्या काही षटकांदरम्यान माझ्यावर दडपण होते मात्र गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आम्ही विचार करत होतो की नोर्टजे आणि रबादाच्या गैरहजेरीत आम्ही कसे खेळणार. उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून आम्ही आमचा सर्वश्रेष्ठ संघ मैदानात उतरवला. 

शिखर धवन आणि पृथ्वी या सलामीवीरांचे कौतुक करताना पंत म्हणाला की पृथ्वी आणि शिखर यांनी पॉवर प्लेमध्ये संघासाठी उत्तम कामगिरी केली. त्यांनी संयम राखत चेंडू सीमेपलीकडे टोलवण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी