आयपीएल २०२१ : 'हे' पाच खेळाडू बनवू शकतात 'आरसीबी'ला 'चॅम्पियन'

IPL 2021
Updated Apr 01, 2021 | 22:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

आतापर्यत आरसीबीला जरी एकदाही आयपीएलचा किताब जिंकता आलेला नसला तरी या सीझनच्या लिलावादरम्यान आरसीबीने अशा काही खेळाडूंची निवड केली आहे जे एकट्याच्या जीवावर टीमला चॅम्पियन बनवू शकतात.

IPL 2021: First fight between RCB & Mumbai Indians
आयपीएल: सीझनचा पहिला मुकाबला आरसीबी आणि मुंबई इंडियन्समध्ये  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आयपीएल २०२१ सीझनचा पहिला मुकाबला आरसीबी आणि मुंबई इंडियन्समध्ये
  • विराट कोहली आरसीबीच्या फलंदाजीचा कणा
  • २०२१च्या सीझनद्वारे न्यूझीलंडच्या जेमीसनची आयपीएलमध्ये सुरूवात

आयपीएलच्या १४ व्या मोसमाची सुरूवात होण्यास काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या (IPL 14 Season) या सीझनमधील पहिला सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers bangalore)आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. आतापर्यत आरसीबीला जरी एकदाही आयपीएलचा किताब जिंकता आलेला नसला तरी या सीझनच्या लिलावादरम्यान आरसीबीने अशा काही खेळाडूंची निवड केली आहे जे एकट्याच्या जीवावर टीमला चॅम्पियन बनवू शकतात.

कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा बनवणारा विराट कोहली आरसीबीच्या फलंदाजीचा कणा आहे. कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यत १९२ सामन्यांमधून १३०.७३ च्या स्टाईक रेटने ५८७८ धावा काढल्या आहेत. आयपीएलच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रमसुद्धा विराट कोहलीच्याच नावावर आहे. २०१६ मध्ये विराटने आयपीएलमध्ये चार शतकं ठोकली होती. 

'मिस्टर ३६० डिग्री' अर्थात एबी डिव्हिलियर्स

क्रिकेट जगतात मिस्टर ३६० डिग्री या नावाने प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) हा या संघाच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी आहे. डिव्हिलियर्सच्या गुणवत्तेबद्दल सर्वांनाच कल्पना आहे. डिव्हिलियर्सच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटने ४,००० धावा बनवण्याचा विक्रम जमा आहे. आयपीएल २०२० मध्ये एबीने १५८.७४ च्या स्टाईक रेटने ४५४ धावा चोपून काढल्या होत्या. आयपीएलच्या १६९ सामन्यांमधून त्याने ४८४९ धावा काढल्या आहेत. या धावा त्याने १५१.९१च्या स्टाईक रेटने ठोकल्या आहेत.

लेग स्पिनर युजवेंद्र चहल

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशालिस्ट गोलंदाज युजवेंद्र चहल आरसीबीच्या संघात दीर्घ काळापासून आहे. संघाचा तो महत्त्वाचा खेडाळू आहे. चहलने आयपीएलच्या मागील मोसमात आपल्या संघासाठी सर्वाधिक २१ विकेट मिळवले होते. आपल्या चतुर गोलंदाजीद्वारे युजवेंद्र चहलने आरसीबीला अनेक सामने जिंकून दिले आहेत. चहलच्या नावावर आयपीएलच्या ९९ सामन्यांमधून १२१ विकेट जमा आहेत.

अष्टपैलू डॅनियल क्रिस्तिएन

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू, डॅनियल क्रिस्तिएन (Daniel Christian)ला टी-२० क्रिकेटचा स्पेशालिस्ट खेळाडू समजले जाते. २०२१च्या आयपीएल लिलाव प्रक्रियेच्या वेळेस आरसीबीने डॅनियल क्रिस्तिएनला ४.८० कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले होते. डॅनियलच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील ३४७ सामन्यांमधून ५१७१ धावा आणि २५९ विकेटची नोंद आहे.

तेज काईल जेमीसन

न्यूझीलंडचा तेज गोलंदाज काईल जेमीसन (Kyle Jamieson)ला रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने (RCB)आयपीएल २०२१ च्या लिलाव प्रक्रियेत १५ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. जेमीसन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक रकमेने करारबद्ध होणारा तिसरा परकी खेडाळू आहे. ६.६ उंचीचा जेमीसन न्यूझीलंडसाठी सहा कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि आठ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्याच्या नावावर ३६ तर एकदिवसीय सामन्यात तीन आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चार बळींची नोंद आहे. २०२१च्या सीझनद्वारे जेमीसन आयपीएलमध्ये सुरूवात करतो आहे. या पार्श्वभूमीवर जेमीसनवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी