आयपीएल 2021: अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स जाणार का कोलकाता नाइट रायडर्स? धोनीला कोण देणार आव्हान, आज कळेल

IPL 2021
भरत जाधव
Updated Oct 13, 2021 | 16:03 IST

आयपीएलचा किताब पहिल्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ (Delhi Capitals) फायनल गाठण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.

Will Kolkata Knight Riders go to final or Delhi Capitals
आयपीएल 2021: अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स जाणार का कोलकाता नाइट रायडर्स?   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आयपीएलचा किताब पहिल्यांदा जिंकण्यासाठी दिल्ली उत्सुक
  • तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब मिळवण्यासाठी कोलकाताला दिल्लीला करावं लागेल पराभूत
  • दिल्लीला आतापर्यंत १५ वेळा कोलकाता टीमने पराभूत केले आहे.

नवी दिल्ली : अत्यंत चढाओढ करत यंदाची आयपीएल (IPL) स्पर्धा अंतिम टप्प्यापर्यंत येऊ पोहचली आहे. आयपीएलचा किताब पहिल्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ (Delhi Capitals) फायनल गाठण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. यासाठी दिल्ली संघाला आज बुधवारी मॉर्गनच्या कोलकाता नाइट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) आव्हानाला सामोरे जावे लागेल. तर तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब आपल्याला मिळावा, यासाठी कोलकाता संघ दिल्लीला पराभूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

या दोन्ही संघांत शारजाच्या मैदानावर दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे.  संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.  यात बाजी मारून दुसऱ्यांदा फायनल गाठण्यावर दिल्ली संघाची नजर लागली आहे. गत वर्षी दिल्ली संघाने फायनल गाठली होती. मात्र, संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दिल्ली व कोलकाता संघातील विजेत्या संघाला फायनलचे तिकीट मिळणार आहे. या विजेत्याला १५ ऑक्टोबर रोजी फायनलमध्ये तीन वेळच्या चॅम्पियन धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. दोन वेळच्या किताब विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाची नजर आता अंतिम फेरीतील प्रवेशाकडे लागली आहे.  यासाठी सात वर्षांपासून कोलकाता संघ प्रयत्नशील आहे. या संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये फायनल गाठून किताब पटकावला होता.

दिल्ली संघाला विजयाने विक्रमाची संधी :

दिल्ली संघाने गतवर्षी आयपीएलची फायनल गाठली होती. त्यामुळे आता दिल्लीला पुन्हा एकदा अंतिम फेरीतील प्रवेशाची संधी आहे. यातून दिल्ली संघाला सलग दुसऱ्यांदा आयपीएल गाठून विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. याशिवाय अशा प्रकारची कामगिरी करणारा दिल्ली हा दुसरा संघ ठरेल. यापुर्वी सलग दोनवेळा फायनल गाठण्याची कामगिरी मुंबई आणि चेन्नई संघाने केलेली आहे.

सध्या दिल्लीचा युवा कर्णधार ऋषभ पंतही फॉर्मात आहे. त्याने आपल्या कुशल नेतृत्वात विजयी मोहीम कायम ठेवताना संघाच्या किताबाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. दरम्यान दिल्ली संघाला आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकात्याविरुद्ध विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. दिल्लीला आतापर्यंत १५ वेळा कोलकाता टीमने पराभूत केले. आतापर्यंत या दोन्ही संघांत २८ सामने झाले आहेत. यातील १२ सामन्यांत दिल्लीने विजयाची नोंद केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी