Sanju Samson IPL 2022 | मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (MI vs RR) शनिवारी जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी सांघिक खेळी करत शानदार प्रदर्शन केले. जॉस बटलरने तर २०२२ आयपीएल मधील पहिले शतक देखील झळकावले. सांघिक खेळाच्या जोरावर अखेर राजस्थानच्या संघाने विजय मिळवला. मात्र सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजस्थानच्या संघाचा कर्णधार संजू सॅमसन. संजू सॅमसनने मैदानात येताच चौकार आणि षटकारांचा वर्षाव करण्यास सुरूवात केली. सॅमसनने केवळ २७ चेंडूत ५५ धावांची आक्रमक खेळी केली. या शानदार खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ५ षटकार लगावले. (IPL 2022 This wicketkeeper-batsman will remove Rishabh Pants in Indian team).
अधिक वाचा : संगीतकार रिकी केजने भारतीयांसाठी दिली खुशखबर
त्याने मुंबई इंडियन्सविरूध्दच्या सामन्यात २०३ च्या स्ट्राईक रेटनुसार फलंदाजी केली आणि भारतीय संघाचा सध्या विकेटकिपर असलेल्या रिषभ पंतच्या अडचणीत वाढ झाली. कारण त्याच्या या आक्रमक खेळीमुळे त्याची भारतीय संघात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. लवकरच तो भारतीय संघात खेळताना पाहायला मिळू शकतो.
संजू सॅमसन फलंदाजीत उत्कृ्ष्ट आहेच मात्र तेवढाच शानदार तो एक विकेटकिपर देखील आहे. याशिवाय तो एक यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्याकडे असलेले हे विविध पैलू पाहता त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकते. संजू विरोधी संघाला कोणत्याही क्षणी धूळ चारण्यात माहीर असलेला आक्रमक खेळाडू आहे.
दरम्यान, आयपीएल बाबत भाष्य करायचे झाले तर, इथे देखील सॅमसनचे प्रदर्शन शानदार आहे. त्याने १२१ सामन्यांत तब्बल ३०८६ धावा केल्या आहेत. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत भाष्य केले तर इथे संजूने फक्त एक एकदिवसीय सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने ४६ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने १० टी-२० सामन्यांत सहभाग घेतला आहे ज्यामध्ये त्याच्या खेळीतून ११७ धावा निघाल्या आहेत.