किंग्स इलेव्हन पंजाबचा ५ विकेट राखून विजय

IPL Match 38 KXIP vs DC Kings XI Punjab won by 5 wickets किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धची मॅच ५ विकेट राखून जिंकली

IPL 2020
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • किंग्स इलेव्हन पंजाबसमोर १६५ धावांचे आव्हान, दिल्ली कॅपिटल्स - २० ओव्हरमध्ये ५ बाद १६४ धावा
  • शिखर धवनच्या ६१ चेंडूत नाबाद १०६ धावा
  • किंग्स इलेव्हन पंजाबचा ५ विकेट राखून विजय

दुबई (Dubai): किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धची मॅच ५ विकेट राखून जिंकली. दिल्ली कॅपिटल्सने दिलेले १६५ धावांचे आव्हान किंग्स इलेव्हन पंजाबने १९ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून पूर्ण केले. किंग्स इलेव्हन पंजाबच्या निकोलस पूरनने सर्वाधिक ५३ धावा केल्या. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ही कामगिरी केली. तो कसिगो रबाडाच्या चेंडूवर रिषभ पंतकडे झेल देत बाद झाला. 

याआधी धावांचा पाठलाग करण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबकडून सलामीला के एल राहुल आणि मयांक अगरवाल आले. राहुल १५ धावा करुन अक्षर पटेलच्या चेंडूवर डॅनिअल सॅम्सकडे झेल देून परतला तर मयांक अगरवाल ५ धावा करुन धावचीत झाला. तडाखेबाज फलंदाज अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २९ धावा केल्या. गेलला रविचंद्रन अश्विनने क्लीनबोल्ड केले. निकोलस पूरनने शानदार अर्धशतकी खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल २४ चेंडूत ३ चौकारांसह ३२ धावा करुन कसिगो रबाडाच्या चेंडूवर रिषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला. दीपक हूडाने नाबाद १५ आणि जीमी नीशामने नाबाद १० धावा केल्या. 

अशी झाली १९ वी ओव्हर

किंग्स इलेव्हन पंजाब १८व्या ओव्हर अखेर पाच बाद १५७ अशा स्थितीत होता. दीपक हूडा आणि जीमी नीशाम मैदानात होते. जिंकण्यासाठी फक्त ८ धावा आवश्यक होत्या. पहिल्या तीन चेंडूंवर एकेरी धाव, चौथ्या चेंडूवर शून्य धावा आणि पाचव्या चेंडूवर पुन्हा एकेरी धाव घेतल्यानंतर जीमी नीशामने शानदार षटकार मारुन विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिल्ली कॅपिटल्स - २० ओव्हरमध्ये ५ बाद १६४ धावा

आयपीएलच्या (IPL 2020) ३८व्या लीग मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० ओव्हरमध्ये ५ बाद १६४ धावा केल्या. त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबसमोर (Kings XI Punjab) १६५ धावांचे आव्हान ठेवले.

शिखर धवनच्या ६१ चेंडूत नाबाद १०६ धावा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन चमकला. त्याने ६१ चेंडूत नाबाद १०६ धावा केल्या. यात १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. शिखरच्या शानदार शतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने १६४ धावा केल्या. त्याला सहकाऱ्यांकडून जास्त साथ लाभली नाही. शिखर सोबत सलामीला आलेला पृथ्वी शॉ फक्त सात धावा करुन जीमी निशामच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलकडे झेल देऊन परतला. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. अय्यर मुरुगन अश्विनच्या चेंडूवर के. एल. राहुलच्या हाती झेल देऊन तर पंत ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर मयांक अगरवालच्या हाती झेल देऊन परतला. मार्कस स्टोइनिस ९ धावा करुन मोहम्मद शमीच्या चेंडूवर मयांक अगरवालच्या हाती झेल देऊन परतला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरला मोहम्मद शमीने क्लीनबोल्ड केले. हेटमायर १० धावा करू शकला.

असे आहे पॉइंट्स टेबल

दिल्ली कॅपिटल्स १४ पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स चांगला रनरेट असल्यामुळे १२ पॉइंट्ससह दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १२ पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स १० पॉइंट्ससह चौथ्या तर किंग्स इलेव्हन पंजाब चांगला रनरेट आणि ८ पॉइंट्ससह पाचव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स ८ पॉइंट्ससह सहाव्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद चांगला रनरेट आणि सहा पॉइंट्ससह सातव्या तर चेन्नई सुपरकिंग्स ६ पॉइंट्ससह शेवटच्या म्हणजेच आठव्या स्थानावर आहे. बुधवारी अबुधाबीत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची मॅच आहे. पॉइंट्स टेबलमध्ये कोलकाता चौथ्या आणि बंगळुुरू तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये फक्त २ पॉइंट्सचे अंतर आहे.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी