SRH vs DC एकतर्फी मॅच, सनरायजर्स हैदराबादचा ८८ धावांनी विजय

IPL MATCH 47 SRH vs DC आयपीएलच्या ४७व्या लीग मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शानदार खेळ केला. या एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला.

IPL MATCH 47 SRH vs DC Sunrisers Hyderabad won by 88 runs
आयपीएल (साभार - iplt20) 

थोडं पण कामाचं

  • एकतर्फी मॅच, सनरायजर्स हैदराबादचा ८८ धावांनी विजय
  • राशीद खानने ४ ओव्हरमध्ये ७ रन देत घेतल्या ३ विकेट
  • संदीप शर्मा आणि टी. नटराजनने घेतल्या प्रत्येकी २ विकेट

दुबई (Dubai): सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला. सनरायजर्स हैदराबादच्या राशीद खानने ४ ओव्हरमध्ये ७ रन देत ३ विकेट घेतल्या तर संदीप शर्मा आणि टी. नटराजनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. शाबाझ नदीम, विजय शंकर आणि जेसन होल्डरने प्रत्येकी १ विकेट घेतली. (IPL MATCH 47 SRH vs DC Sunrisers Hyderabad won by 88 runs)

प्रथम फलंदाजी करुन सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची दमछाक झाली. त्यांची पूर्ण टीम १९ ओव्हरमध्ये १३१ धावांत गारद झाली. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात वाईट झाली. पहिलीच विकेट फक्त १ धाव झाली असताना गेली. यानंतर दिल्लीच्या कामगिरीला उतरती कळा लागली. दिल्ली कॅपिटल्सकडून रिषभ पंतने सर्वाधिक ३६ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने २६, तुषार देशपांडेने नाबाद २०, तर शिमरॉन हेटमायरने १६ धावा केल्या. बाकीचे फलंदाज जास्त धावा करण्यात अपयशी ठरले. शिखर धवनने शून्य, मार्कस स्टोइनिसने ५, श्रेयस अय्यरने ७, अक्षर पटेलने १, कगिसो रबाडाने ३, रविंचंद्रन अश्विनने ७, एनरिच नॉर्टजेने १ धावा केल्या. 

सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला दिले २२० धावांचे आव्हान

आयपीएलच्या ४७व्या लीग मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला २२० धावांचे आव्हान दिले. टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा घेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये २ बाद २१९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी सनरायजर्स हैदराबादला शतकी सलामी दिली. वॉर्नर ३४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६६ धावा करुन रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन बाद झाला. नंतर आलेल्या मनिष पांड्येने वृद्धिमान साहाला चांगली साथ दिली. 

वृद्धिमान साहाने ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांचा पाऊस पाडून ८७ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादकडून या मॅचमध्ये सर्वाधिक धावा त्यानेच केल्या. साहाला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तो एनरिच नॉर्टजेच्या चेंडूवर श्रेयस अय्यरकडे झेल देऊन परतला. साहा बाद झाल्यानंतर मनिष पांड्ये आणि केन विल्यमसन अखेरपर्यंत नाबाद राहिले. मनिष पांड्येने ३१ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारत नाबाद ४४ धावांची खेळी केली तर केन विल्यमसनने १० चेंडूत एक चौकार मारुन नाबाद ११ धावा केल्या.

पॉइंट्स टेबल

सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा मोठा पराभव झाला. या पराभवाचा परिणाम पॉइंट्स टेबलमध्ये दिसला. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे १४ पॉइंट्स तर किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे १२ पॉइंट्स आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने १० तर चेन्नई सुपरकिंग्सचे ८ पॉइंट्स आहेत. समान पॉइंट्स असलेल्या टीमचा रनरेट तपासून चांगला रनरेट असलेल्या टीमला वरचे स्थान असा क्रम निश्चित करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स पहिल्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या, दिल्ली कॅपिटल्स तिसऱ्या, किंग्स इलेव्हन पंजाब चौथ्या, कोलकाता नाईट रायडर्स पाचव्या, सनरायजर्स हैदराबाद सहाव्या, राजस्थान रॉयल्स सातव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स आठव्या स्थानावर आहे. 

बुधवारी मुंबई विरुद्ध बंगळुरू

आयपीएलमध्ये बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी ४८वी लीग मॅच आहे. पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची टक्कर होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपापली १२ वी मॅच खेळत आहेत तर बाकीच्या टीमच्या प्रत्येकी १२ मॅच खेळून झाल्या आहेत. बुधवारची मॅच जिंकणारी टीम पॉइंट्स चेबलमध्ये १६ पॉइंट्ससह पहिले स्थान पटकावणार आहे. ही मॅच जिंकणाऱ्या टीमचा प्ले ऑफ मधील प्रवेश निश्चित होईल. 

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी