दिल्ली जिंकत कोलकाताची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक; आता अंतिम लढत चेन्नईशी

IPL 2021
भरत जाधव
Updated Oct 14, 2021 | 08:23 IST

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

 KKR third time in final; Now the final fight with Chennai!
कोलकाताची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक; आता अंतिम लढत चेन्नईशी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दिल्ली कॅपिटल्सचे सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये​​​​​​​ प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले.
  • अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार
  • कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव केला.

नवी दिल्ली : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवासह ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचे सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये​​​​​​​ प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. तर केकेआर तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरली. आयपीएल २०२१चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार आहे.

शारजाच्या संथ खेळपट्टीवर रंगलेल्या या रंगतदार दुसऱ्या क्वालिफायर  सामन्यात कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा परिणाम आणि कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीला २० षटकात ५ बाद १३५ धावा करता आल्या. प्रत्त्युत्तरात सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशादायक कामगिरी करत थोडी धाकधूक वाढवली. अटातटीच्या वेळी अवघ्या २ चेंडूत ६ धावांची गरज असताना भरवशाचा फलंदाज राहुल त्रिपाठीने षटकार ठोकत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या व्यंकटेश अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 

कसा होता कोलकाताचा डाव

शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकातासाठी जबरदस्त सुरुवात केली. संथ खेळपट्टीवर कोणताही दबाव न घेता व्यंकटेश अय्यरने आपला आक्रमक पवित्रा कायम राखला. १२व्या षटकात अय्यरने आपले आयपीएलमधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने रबाडा, नॉर्किया, अश्विनला खंबीर सोमोरे जात कोलकाताला सुस्थितीत पोहोचवले. संघाचे शतक फलकावर लावण्याअगोदर अय्यर झेलबाद झाला. त्याने गिलसोबत ९६ धावांची दमदार सलामी दिली.

अय्यरने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. त्यानंतर आलेला नितीश राणा कोलकाताला विजयासाठी १३ धावांची गरज असताना माघारी परतला. पुढच्या षटकात शुबमनही माघारी परतला. त्याने ४६ धावा केल्या. यानंतर कोलकाताने पाच धावांत चार फलंदाज गमावले. २०व्या षटकात अश्विनने शाकिब अल हसन आणि सुनील नरिनला माघारी पाठवले. तो हॅट्ट्रिकवर असताना कोलकाताला विजयासाठी २ चेंडूत ६ धावांची गरज होती, परंतू राहुल त्रिपाठीने त्याला षटकार खेचत कोलकाताला अंतिम सामन्यात पोहोचवले. दिल्लीकडून नॉर्किया, अश्विन आणि रबाडाने प्रत्येकी २ बळी घेतले.

कसा होता  दिल्लीचा डाव

दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी सलामी दिली. कोलकाताविरुद्ध चांगली आकडेवारी असणाऱ्या पृथ्वीने चांगली सुरुवात केली होती, पण पाचव्या षटकात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने गोलंदाजीला येत त्याला पायचित पकडले. पृथ्वीला २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या. आठव्या षटकात धवनसोबत मार्कस स्टॉइनिसने दिल्लीचे अर्धशतक पूर्ण केले. शारजाहच्या संथ खेळपट्टीवर दिल्लीला आपला वेग वाढवता आला नाही. १० षटकात दिल्लीने १ बाद ६५ धावा केल्या. १२व्या षटकात वेगवान गोलंदाज शिवम मावीने स्टॉइनिसची दांडी गुल केली.

अडखळत सुरुवात केलेल्या स्टॉइनिसने २२ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर धवनने चक्रवर्तीला मोठा फटका खेळण्याच्या नादात शाकिबकडे झेल दिला. धवनने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या. शतक पूर्ण होण्याच्या आधीच दिल्लीने आपला पाचवा गडी शिमरोन हेटमायरच्या रुपात गमावला होता, पण वरुण चक्रवर्तीचा चेंडू नोबॉल ठरला. पण या जीवदानाचा हेटमायरला फायदा उचलता आला नाही. १९व्या षटकात हेटमायर धावबाद झाला. शेवटच्या षटकात श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने शिवम मावीला १५ धावा कुटल्या. दिल्लीने २० षटकात ५ बाद १३५ धावा केल्या. अय्यरने नाबाद ३० धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी