कोलकाताचा ८६ धावांनी विजय

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Oct 07, 2021 | 23:59 IST

राजस्थान रॉयल्स विरुद्धची कोलकाता नाईट रायडर्सची मॅच एकतर्फी झाली. कोलकाताने ही मॅच ८६ धावांनी जिंकली आणि १४ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान पटकावले.

Kolkata Knight Riders won by 86 runs against Rajasthan Royals
कोलकाताचा ८६ धावांनी विजय 

थोडं पण कामाचं

  • कोलकाताचा ८६ धावांनी विजय
  • १४ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान पटकावले
  • ३.१ ओव्हर टाकून २१ धावा देत राजस्थानच्या चार फलंदाजांना बाद करणारा शिवम मावी मॅन ऑफ द मॅच

शारजा: राजस्थान रॉयल्स विरुद्धची कोलकाता नाईट रायडर्सची मॅच एकतर्फी झाली. कोलकाताने ही मॅच ८६ धावांनी जिंकली आणि १४ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान पटकावले. आता मुंबईला त्यांच्या प्ले ऑफ राउंडच्या अखेरच्या मॅचमध्ये मोठ्या फरकाने जिंकावे लागेल. अन्यथा कोलकाता पुढल्या फेरीत प्रवेश करणार हे निश्चित आहे. Kolkata Knight Riders won by 86 runs against Rajasthan Royals

शारजात झालेल्या प्ले ऑफ राउंडच्या ५४व्या मॅचमध्ये टॉस जिंकून राजस्थानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना भोवला. कोलकाताने वीस ओव्हरमध्ये चार बाद १७१ धावा केल्या. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानला कोलकाताने १६.१ ओव्हरमध्ये ऑल आऊट केले. राजस्थानला फक्त ८५ धावा करणे जमले. या मॅचमध्ये ३.१ ओव्हर टाकून २१ धावा देत राजस्थानच्या चार फलंदाजांना बाद करणारा शिवम मावी मॅन ऑफ द मॅच झाला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताकडून शुभमन गिलने ५६, वेंकटेश अय्यरने ३८, नितिश राणाने १२, राहुल त्रिपाठीने २१, दिनेश कार्तिकने नाबाद १४, इऑइन मॉर्गनने नाबाद १३ धावा केल्या. राजस्थानकडून चेतन सकारिया, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानची दाणादाण उडाली. यशस्वी जयस्वाल, अनुज रावत आणि ख्रिस मॉरिस हे तिघे शून्यावर बाद झाले तर मुस्तफिझुर रेहमान शून्यावर नाबाद राहिला. लियाम लिव्हिंगस्टोनने ६, संजू सॅमसनने १, शिवम दुबेने १८, ग्लेन फिलिप्सने ८, राहुल तेवतियाने ४४, जयदेव उनाडकटने ६, चेतन सकारियाने (धावचीत) १ धाव केली. कोलकाताकडून शिवम मावीने ४, लॉकी फर्ग्युसनने ३, शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

पॉइंट्स टेबल

दिल्ली कॅपिटल्स (२० गुण), चेन्नई सुपरकिंग्स (१८ गुण) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१६ गुण) या तीन टीम आयपीएलच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स (१४ गुण), पाचव्या स्थानी पंजाब किंग्स (१२ गुण), सहाव्या स्थानी मुंबई इंडियन्स (१२ गुण), सातव्या स्थानी राजस्थान रॉयल्स 
(१० गुण) आणि आठव्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद (६ गुण) आहे. 

शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार टीम त्यांची प्ले ऑफ राउंडची शेवटची मॅच खेळणार आहेत. यापैकी हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील मॅच मुंबईने मोठ्या फरकाने जिंकली तरच त्यांना सरस धावगतीच्या (रनरेट) जोरावर कोलकाताला मागे टाकून पुढल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळेल. सध्या कोलकाताची धावगती मुंबईच्या तुलनेत उत्तम असल्यामुळे मुंबईसाठी पुढल्या फेरीत प्रवेश करण्याचे आव्हान बिकट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी