प्रेक्षक आणि मीडियाच्या अनुपस्थितीत होणार आयपीएल

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 09, 2021 | 00:56 IST

आयपीएल स्पर्धेचा चौदावा हंगाम शुक्रवार ९ एप्रिल २०२१ पासून सुरू होत आहे. यंदा कोरोना संकटामुळे प्रेक्षक आणि मीडियाच्या अनुपस्थितीत आयपीएल होणार आहे.

media and cricket viewers not allowed to enter stadium for IPL coverage says BCCI
प्रेक्षक आणि मीडियाच्या अनुपस्थितीत होणार आयपीएल 

थोडं पण कामाचं

  • प्रेक्षक आणि मीडियाच्या अनुपस्थितीत होणार आयपीएल
  • आयपीएल स्पर्धेचा चौदावा हंगाम शुक्रवार ९ एप्रिल २०२१ पासून सुरू
  • टीव्ही तसेच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून खेळाचा आनंद घ्यावा लागणार

नवी दिल्ली: आयपीएल स्पर्धेचा चौदावा हंगाम शुक्रवार ९ एप्रिल २०२१ पासून सुरू होत आहे. यंदा कोरोना संकटामुळे प्रेक्षक आणि मीडियाच्या अनुपस्थितीत आयपीएल होणार आहे. सर्व संघ बायो बबलमध्ये आहेत. खेळाडू ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे नियोजीत मैदानावर मॅच खेळतील. प्रेक्षक आणि मीडियाचे प्रतिनिधी (प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी) टीव्ही तसेच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून खेळाचा आनंद घेतील. खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या पत्रकार परिषदा (प्रेस कॉन्फरन्स) व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने पार पडतील. क्रीडा प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने उपस्थित राहून प्रश्न विचारू शकतील. कोरोना संकट नियंत्रणात आले तर या निर्णयात बदल करण्याबाबत विचार होईल. तोपर्यंत प्रेक्षक आणि मीडियाच्या अनुपस्थितीत आयपीएल होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. मीडियाला आयपीएल मॅच (सामना) तसेच प्रॅक्टिस सेशन (सराव सत्र) या दोन्हीचे स्टेडियममध्ये उपस्थित राहून अथवा मैदानात प्रवेश करुन कव्हरेज करण्यास मनाई आहे. media and cricket viewers not allowed to enter stadium for IPL coverage says BCCI

आयपीएल २०२१ वेळापत्रक

कोविड प्रोटोकॉलचे पालन करत ९ एप्रिलपासून आयपीएल

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये सामने होतील. अहमदाबादमध्ये होणार असलेले आयपीएलचे सर्व सामने सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहेत. स्पर्धेचा पहिला सामना ९ एप्रिल रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा हा सामना आहे. स्पर्धेचा समारोप ३० मे रोजी अहमदाबाद येथे अंतिम सामन्याने होणार आहे. 

प्ले ऑफ राउंडचे आठ, क्वालिफायर राउंडचे दोन, एलिमिनेटर राउंडचा एक आणि फायनल राउंडचा एक असे बारा सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. बंगळुरू, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये प्ले ऑफ राउंडचे प्रत्येकी दहा सामने होतील. दिल्लीत प्ले ऑफ राउंडचे आठ सामने होणार आहेत. 

यंदा पहिल्यांदाच प्रत्येक संघाला प्ले ऑफ राउंडमध्ये त्याचे घरचे मैदान सोडून अन्य चार शहरांतील मैदानांमध्ये खेळावे लागेल. याआधीच्या १३ हंगामांमध्ये प्रत्येक संघाला प्ले ऑफ राउंडचे ५० टक्के सामने घरच्या मैदानात खेळण्याची संधी होती. तसेच यावेळच्या आयपीएलमध्ये ११ दिवशी दोन सामने असतील. पहिला सामना दुपारी ३.३० वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता होईल. इतर दिवशी फक्त संध्याकाळी ७.३० वाजता एक सामना असेल. प्रत्येक संघाला प्ले ऑफ राउंड दरम्यान फक्त तीन वेळाच प्रवास करावा लागणार आहे.

हिंदीसह सात भारतीय भाषांमध्ये समालोचन

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे इंग्रजी तसेच हिंदीसह सात भारतीय भाषांमध्ये समालोचन (कॉमेंट्री) होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तामीळ, तेलुगु, कानडी (कन्नड), मल्याळम, बंगाली आणि मराठी भाषेत आयपीएलचे समालोचन (कॉमेंट्री) होणार आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींना आठ भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन (कॉमेंट्री) ऐकण्याची संधी उपलब्ध आहे. समालोचनासाठी १०० जणांची टीम सज्ज आहे. काही समालोचक एकपेक्षा जास्त भाषांमध्ये समालोचन करतील. सुनील गावस्कर, गौतम गंभीर, केव्हिन पीटरसन, आकाश चोपडा, निखील चोपडा, अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, आर. पी. सिंह, दीप दासगुप्ता आणि रोहन गावस्कर हे समालोचकांच्या टीममध्ये आहेत. सुनिल गावस्कर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये समालोचन करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी