मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये!

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 19, 2021 | 02:42 IST

सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन हृदयाशी संबंधित विकारावर उपचार करुन घेण्यासाठी चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल

Muttiah Muralitharan hospitalised
मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये! 

थोडं पण कामाचं

  • मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये!
  • चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल
  • हृदयाशी संबंधित विकारावर उपचार करुन घेणार

चेन्नईः सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन हृदयाशी संबंधित विकारावर उपचार करुन घेण्यासाठी चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. मुथय्या मुरलीधरन रविवार १८ एप्रिल २०२१ रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तिथे त्याच्या काही चाचण्या झाल्या. हृदयात ब्लॉकेज झाल्यामुळे मुरलीधरनवर चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. Muttiah Muralitharan hospitalised

मुरलीधरनच्या हृदयात एक स्टेंट टाकला जाणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यावर आवश्यक डॉक्टरांच्या परवानगी नंतरच तो पुन्हा कार्यरत होऊ शकेल. याआधी शनिवार १७ एप्रिल २०२१ रोजी चेन्नईत झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या मॅचच्या वेळी मुरलीधरन एमए चिदंबरम स्टेडियममध्ये उपस्थित होता. 

मुरलीधरन ४९ वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू आहे. तो श्रीलंकेकडून १३३ टेस्ट मॅच आणि ३५० वन डे खेळला आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० आणि वन डे क्रिकेटमध्ये ५३४ विकेट घेतल्या आहेत. २०११च्या वर्ल्ड कप नंतर मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. तो काही काळ आयपीएलमध्ये खेळला. 

गोलंदाज म्हणून मुरलीधरन चेन्नई सुपरकिंग्ज, कोची टस्कर्स केरला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाकडून खेळला. आयपीएलमध्ये ६६ मॅचमध्ये त्याने ६३ विकेट मिळवल्या. ११ धावा देत तीन विकेट ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलच्या तीन सीझनमध्ये तो चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळला. या तीन सीझनमध्ये मिळून त्याने ४० विकेट घेतल्या. सध्या तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. 

गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे त्याला वारंवार आयसीसीच्या नियमानुसार विशेष चाचण्या द्याव्या लागल्या. अनेकदा त्याच्या गोलंदाजी करण्याच्या अॅक्शनवर आक्षेप नोंदवला गेला. पण प्रत्येकवेळी तो या अडचणीतून बाहेर पडला. टेस्ट क्रिकेटमध्ये १७११ दिवस गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राहण्याचा मान त्याने पटकावला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट, सर्वाधिक वेळा एकाच डावात पाच विकेट हे विक्रम त्याने केले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी