IPL 2022 | मुंबई : आयपीएल २०२२ चा हंगाम दिवसेंदिवस रंगत चालला आहे. आयपीएल २०२२ च्या सत्रातील १६ व्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने पंजाब किंग्जचा ६ बळी राखून पराभव केला. या सामन्यात पंजाबच्या संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने एक साजेशी खेळी करून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. (Shikhar Dhawan became the first Indian who make 1000 boundaries in T20 cricket).
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात शिखर धवनने ३० सामन्यांमध्ये ३५ धावा केल्या, ज्यात चार चौकारांचा समावेश होता. या सामन्यात शिखर धवनने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. शिखर धवन टी-२० क्रिकेटमध्ये १००० चौकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर अशी कामगिरी करणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे.
अधिक वाचा : शंभर रुपयांच्या इंधनावर महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ रूपयांचा कर
शिखर धवन त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा तो आपल्या लयनुसार खेळत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाचा सामना करू शकतो. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. धवनने आयपीएलच्या १९६ सामन्यांमध्ये ५९११ धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा देखील समावेश आहे. आयपीएल मेगा लिलावानंतर शिखर धवनचा पंजाब किंग्सने आपल्या संघात समावेश केला होता. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी धवन सध्या संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
आयपीएल २०२२ मध्ये पंजाबच्या संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत त्यातील दोन सामन्यात संघाचा पराभव झाला आहे तर दोन सामने जिंकण्यात संघाला यश आले आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने गुजरातविरुद्ध शानदार ६४ धावा केल्या. याशिवाय जितेश शर्माने २३ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जने गुजरात टायटन्स संघाला विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य दिले, जे राहुल तेओटियाने मारलेल्या दोन षटकारांच्या जोरावर गुजरात संघाने शेवटच्या षटकात पार केले.