शिखर धवनचे सलग दुसरे नाबाद शतक

shikhar dhawan best performance in ipl शिखर धवनने आयपीएल २०२० स्पर्धेत सलग दुसरे नाबाद शतक झळकावण्याची किमया केली.

shikhar dhawan best performance in ipl historic performance
शिखर धवनचे सलग दुसरे नाबाद शतक 

थोडं पण कामाचं

  • शिखर धवनचे सलग दुसरे नाबाद शतक
  • लागोपाठच्या मॅचमध्ये दोन नाबाद शतके, पहिले CSK आणि दुसरे किंग्स इलेव्हन पंजाब विरोधात
  • आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पाचवा फलंदाज

दुबई (Dubai): 'जो दिल की सुनते है वो शिखर पे रहते है' ही एका जाहिरातीची टॅगलाईन फलंदाजीच्या बाबतीत शिखर धवन (Shikhar Dhawan) या दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) सलामीवीरालाही शोभते. दडपण न घेता फलंदाजीचा मनुराद आनंद लुटणाऱ्या शिखर धवनने आयपीएल २०२० (IPL 2020) स्पर्धेत सलग दुसरे नाबाद शतक झळकावण्याची किमया केली.

शिखर धवनने आयपीएलच्या ३८व्या लीग मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) विरुद्ध खेळताना ६१ चेंडूत नाबाद १०६ धावा केल्या. यात १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याने ५७व्या चेंडूवर शतक झळकावले होते. याआधी शिखर धवनने आयपीएलच्या ३४व्या लीग मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध खेळताना ५८ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या होत्या. त्याने ही खेळी १४ चौकार आणि १ षटकार मारुन सजवली होती. विशेष म्हणजे चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धची ही मॅच दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट राखून जिंकली होती. या मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये ४ बाद १७९ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने १९.५ ओव्हरमध्ये ५ बाद १८५ धावा करुन मॅच जिंकली होती. 

अखेरच्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने ३ षटकारांसह २१ धावा करुन दिल्ली कॅपिटल्सला मॅच जिंकवून दिली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये १७ धावांची गरज होती. ड्वेन ब्राव्होचे पायाच्या हालचाली नियंत्रित करणारे कंबरेचे स्नायू दुखावले. या दुखापतीमुळे ब्राव्हो ऐवजी रविंद्र जाडेजाकडे ओव्हर देण्यात आली. चेन्नई सुपरकिंग्सच्या या निर्णयाचा अक्षर पटेलने फायदा घेतला. अक्षरने रविंद्र जाडेजाला तीन षटकार मारले होते. 

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या या गाजलेल्या मॅचमध्ये शिखर धवनने आयपीएल कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध खेळताना आयपीएलमधील १६८व्या डावात शतक झळकावले होते. यानंतर आयपीएलमधील १६९व्या डावात त्याने किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळताना पुन्हा शतक झळकावले. शिखर धवनने यंदाच्या आयपीएलमध्ये चौथ्यांदा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या. 

शिखर धवनने यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या ६ मॅचमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी केली नव्हती. ०, ३५, ३४, २६, ३२ आणि ५ ही त्याची काममगिरी होती. यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध अबुधाबीत नाबाद ६९ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध ५७ अशी कामगिरी त्याने केली. यानंतर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध ५८ चेंडूत नाबाद १०१ धावा आणि किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळताना ६१ चेंडूत नाबाद १०६ धावा शिखर धवनने केल्या.

ऐतिहासिक कामगिरी

आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूने त्याच्या लागोपाठच्या मॅचमध्ये शतके झळकावल्याची पहिल्यांदाच घडली. यातही लागोपाठ नाबाद शतके हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. शिखर धवनने ही ऐतिहासिक कामगिरी केली. 

शिखर धवनने ओलांडला पाच हजार धावांचा टप्पा

आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पाचवा फलंदाज होण्याची किमया शिखर धवनने साधली. 

  1. विराट कोहली - ५७५९ धावा
  2. सुरेश रैना - ५३६८ धावा
  3. रोहित शर्मा - ५१५८ धावा
  4. शिखर धवन - ५०४४ धावा
  5. डेव्हिड वॉर्नर - ५०३७ धावा

शिखर धवनची आयपीएलमधील कारकिर्द

एकूण मॅच १६९

नाबाद खेळी २४

एकूण धावा ५०४४

सर्वोत्तम नाबाद १०६ धावा

शतके २

अर्धशतके ३९

चौकार ५७५

षटकार १०६

शिखर धवनची २०२०च्या आयपीएलमधील कारकिर्द

एकूण मॅच १०

नाबाद खेळी ३

एकूण धावा ४६५

सर्वोत्तम नाबाद १०६ धावा

शतके २

अर्धशतके २

चौकार ५१

षटकार १०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी